नाशिक : शहरातील अनेक रुग्णालये पालथी घालूनही दोन कोरोना रुग्णांना बेड मिळाला नव्हता. त्यामुळे त्यांनी नाशिक महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले होतं. मात्र यातील एका रुग्णाचा बिटको हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला आंदोलनात घेऊन येणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेड मिळत नसल्याने पालिकेसमोर दोन कोरोना रूग्णांचे आंदोलन
नाशिकमध्ये काल दोन कोरोना रुग्णांना शहरातील हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला नाही. सिडकोच्या कामटवाडा येथील राहणारे संबंधीत कोरोना रूग्ण शहरातील अनेक रुग्णालये फिरले. मात्र, त्यांना कोठेही ऑक्सिजन बेड मिळत नसल्याचे त्यांचं म्हणणं होतं. यामुळे दिवसभर फिरून वैतागलेले त्यांचे नातेवाई आणि सामाजिक कार्यकर्ते दिपक डोके हे संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास ऑक्सिजन सिलेंडर हातात घेऊन रुग्णासमवेत नाशिक महानगरपालिका मुख्यालय आले. पालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ त्यांनी बेड मिळत नसल्याने गांधीगिरी पध्दतीने आंदोलन केले. ह्या घटनेचे गांभीर्य ओळखून मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून मनपाच्या बिटको रुग्णालयात त्यांना दाखल केले होते. मात्र यातील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
महापालिकेत आल्यावरच बेड मिळतो
सिडको कामटवाडा परिसरातील एका व्यक्तीचा तीन दिवसांपूर्वी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. पहिल्या दिवशी त्यांची तब्येत चांगली होती. पण, दुसऱ्या दिवशी त्यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांचे नातेवाईक त्यांना अनेक रुग्णालयांमध्ये घेऊन गेले. परंतु, एकाही रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध नसल्याचे कारण सांगत रुग्णालयांनी उपचारासाठी नकार दिला. अखेर रुग्णालयात घेतले जात नसल्याने संबंधीत कोरोना रूग्णाला घेऊन महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आलो. त्यानंतर महापालिकेच्यावतीने बेड देण्यात आला. ही दुर्दैवी गोष्ट आहे. यातून महापालिकेत आल्यावरच बेड मिळतो हे सिद्ध झाले आहे, असे सामाजिक कार्येकर्ते दीपक डोके यांनी म्हटले आहे.
म्हणून सामाजिक कार्यकर्त्या विरोधात गुन्हा दाखल
बेड मिळत नसल्यामुळे पालिका प्रवेशद्वारावर दोन कोरोना रुग्णांनी आंदोलन केले. त्यातील एका रुग्णाचा बिटको हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. या घटनेची आयुक्त कैलास जाधव यांनी गंभीर दखल घेतली आहे. अत्यंत संसर्गजन्य परिस्थिती असताना आंदोलनासाठी रुग्णाचा वापर केल्याप्रकरणी आयुक्तांच्या आदेशावरून दीपक डोके या सामाजिक कार्यकर्त्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची तक्रार पालिकेचे सुरक्षा अधिकारी शिंदे यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात दिली होती.