नाशिक PM Modi Visit Kalaram Mandir :पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युवा संमेलनाच्या उद्घाटनानिमित्त 12 जानेवारीला नाशिकमध्ये येत आहेत. दुपारी 12 वाजता पंतप्रधान मोदींचं नाशिक विमानतळावर आगमन झाल्यानंतर तेथून ते संभाजीनगरमधील निलगिरी बाग येथील मैदानावर हेलिकॉप्टरनं येतील. हॉटेल मिरची ते संत जनार्दन स्वामी आश्रमापर्यंत त्यांचा रोड शो असेल. संभाजीनगर नाका येथून ते जुन्या आडगाव नाका पंचवटी मालेगाव स्टॅंड मार्गे रामकुंड येथे जातील. तेथे गोदावरी मातेची महाआरती करून ते श्री काळाराम मंदिरात जाऊन रामरक्षा पठण करतील. मोदींच्या काळाराम मंदिर दर्शनावेळी सुरक्षेसाठी काही काळ भाविकांना परिसरात येण्यास मज्जाव असेल. त्यानंतर तपोवन येथील सभास्थळी पंतप्रधान राष्ट्रीय युवा संमेलनाचे उद्घाटन करतील.
आयुष्मान हेल्थ कार्डचं करणार वितरण : देशातील प्रत्येक धार्मिक स्थळावर आता प्रसाद म्हणून आयुष्यमान हेल्थ कार्ड दिलं जाणार आहे. पंतप्रधान मोदींच्या नाशिक दौऱ्याच्या निमित्तानं आयुष्यमान हेल्थ कार्डचा नवा पॅटर्न संपूर्ण देशभरात पोचणार आहे. त्याची सुरुवात पंचवटीतील श्री काळाराम मंदिर पासून होणार असल्याची माहिती आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे यांनी दिली. मंदिर परिसरात त्यासाठी कक्ष उभारण्यात येत असून येणाऱ्या प्रत्येक भाविकांची माहिती घेऊन मंदिरात जाताना त्यांची नोंदणी आणि दर्शन झाल्यानंतर बाहेर पडेपर्यंत भाविकांच्या मोबाईलमध्ये आयुष्मान हेल्थ कार्ड जनरेट होईल असा विश्वास थेटे यांनी व्यक्त केला.
श्री काळाराम मंदिराप्रमाणेच त्र्यंबकेश्वर मंदिरात देखील आयुष्मान हेल्थ कार्ड वितरण करण्याचं नियोजन करण्यात आलंय. - ओमप्रकाश शेटे, आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष
मोदींनी काळाराम मंदिरच का निवडले :नाशिकचे श्री काळाराम मंदिर हे हेमाडपंथी बांधकाम असलेलं प्राचिन मंदिर आहे. प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता मातेची प्राचीन मूर्ती या मंदिरात विराजमान आहे. या काळाराम मंदिरात देशभरातून पर्यटक दर्शनासाठी येत असतात. तसंच दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं. म्हणूनही या मंदिराचे अनेक ऐतिहासिक पैलू असल्यानं पंतप्रधान मोदींनी या मंदिराची दर्शनासाठी निवड केल्याचं म्हंटलं जातंय.
पेशवेकालीन मंदिर :श्री काळाराम मंदिराच्या ठिकाणी श्रीरामांची ‘पर्णकुटी’ होती. श्रीराम हे सव्वादोन वर्षे पंचवटीत वास्तव्याला होते. या स्थानाला वैष्णवांच्या दृष्टीनं फार महत्त्व आहे. ओढा नाशिकरोड येथील जहागिरी असलेले पेशव्यांचे सरदार रंगनाथ ओढेकर यांना माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांनी मंदिराचे बांधकाम करण्याची आज्ञा दिली होती. याच काळात ओढेकर यांना ‘तुम्ही मंदिराचा जीर्णोद्धार करावा’ असा रामाचा स्वप्नदृष्टांत झाल्याचं बोललं जातं. काळाराम मंदिर असलेल्या ठिकाणी पूर्वी लाकडी मंदिर होतं. समर्थ रामदास स्वामींनी याच मंदिरात रामाची उपासना केली होती. मंदिरातील मूर्ती काही शतकांपूर्वी नाशिकमधील गोदावरी नदीच्या रामकुंडात मिळाल्या होत्या. या मूर्ती वालुकामय आहेत. मंदिराच्या बांधकामासाठी नाशिकपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘रामशेज’ नावाच्या डोंगरावरून दगड आणण्यात आले. या डोंगरावर राम रात्री निद्रा करण्यासाठी जात असत, असंही बोललं जातं. या डोंगरावरील दगड काढल्यानंतर दूध आणि नवसागर टाकून उकळून त्याचे परीक्षण केले गेले. तेच दगड वापरण्यात आले. 1778 ते 1790 या कालखंडात मंदिर पूर्ण झालं. त्यावेळेस या मंदिराच्या बांधकामाला 23 लाख रुपये इतका खर्च आला होता.