नाशिक - कोरोना विषाणूच्या प्रसाराला प्रतिबंध घालण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र, या लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्यांसह कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही सहन करावा लागला. मे ते जुलै या तीन महिन्यात बाजारपेठेत कांद्याला मागणी नव्हती. त्यामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. दरम्यान, मागील पंधरा दिवसापासून कांद्याची मागणी वाढल्याने बाजारातील दर वधारले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
तीन महिन्यानंतर कांद्याला समाधानकारक भाव जिल्ह्यात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. नाशिकच्या कांद्याला देशातच नाही तर परदेशात देखील मोठी मागणी असते. त्यामुळे दरवर्षी नाशिकहून लाखो मेट्रिक टन कांदा देशा सोबत परदेशात देखील निर्यात केला जातो. मात्र, कोरोना महामारीमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. मे, जून, जुलै 2020 या महिन्यात कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात घटली होती. तसेच वाहतुकीस येणाऱ्या अडचणीमुळे कांद्याला सरासरी 500 ते 700 क्विंटल इतका कमी भाव मिळाला. यामध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघाला नाही.
आता देश हळूहळू अनलॉक होत आहे. तसेच 15 ऑगस्टपासून महाराष्ट्रसोबत इतर राज्यात कांदा वाहतूकही सुरळीत झाली आहे. त्यामुळे सध्या कांद्याची मागणी वाढली असून कांद्याला आता सरासरी 1500 ते 1700 क्विंटल भाव मिळत आहे. कांद्याचे दर वधारल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे शिल्लक राहत आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सध्या नाशिकच्या किरकोळ बाजारात 20 ते 22 किलो रुपयांनी ग्राहकांना कांदा खरेदी करावा लागत आहे.
शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून कांद्याची साठवणूक -
नाशिक जिल्ह्यात एप्रिल महिन्यात उन्हाळी ( गावठी) कांदा काढला जातो. हा कांदा टिकाऊ असून पुढे डिसेंबरपर्यंत बाजारात येत राहतो. शेतकरी आणि काही व्यापारी या कांद्याची साठवणूक करून ठेवतात. त्यानंतर बाजारभाव पाहून शेतकरी आणि व्यापारी तो साठवलेला कांदा विक्री करतात. त्यामुळे काही शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळतो. मात्र, शेतकऱ्यांकडे कांदा साठविण्याचे गोदामे नसल्याने व्यापारीवर्गातूनच स्वस्त दरात कांदा खरेदीकरून साठे बाजी करत नंतर तो चढ्या दराने विक्रीस आणला जातो.
25 ते 30 टक्के कांदा चाळीत खराब झाला-
नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी एप्रिल महिन्यात उन्हाळी ( गावठी) कांद्याची साठवणूक केली आहे. हा कांदा टाकाऊ असला तरी वातावरण बदलामुळे शेतकऱ्यांच्या चाळीतील 25 ते 30 टक्के कांदा खराब झाल्याचे शेतकरी सांगतात. सद्यस्थितीत कांद्याला समाधानकारक भाव मिळत असला तरी काही प्रमाणात कांदा खराब झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
कांदा निर्यातीत देखील येता अडचणी -
भारतासोबत चीन आणि पाकिस्तानमध्येदेखील कांद्याचे मोठ्या प्रमाणत उत्पादन घेतले जाते. हे देश भारताचे प्रतिस्पर्धी म्हणून इतर देशात निर्यात करत असतात. मात्र, भारताच्या कांद्याची पत चांगली असल्याने भारताच्या कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असते. सध्या नाशिक जिल्ह्यातून मलेशिया, सिंगापूर, श्रीलंका, लंडन या देशात निर्यात केली जाते. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे भारतीय कस्टम विभागाकडून अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याचे निर्यात करण्यात अडचणी येत असल्याचे निर्यातदार सांगतात.