नाशिक- जिल्ह्यात मद्य दुकानांवरील गर्दी टाळण्यासाठी टोकन पद्धतीने मद्य विक्री करता येईल का? याची चाचपणी राज्य उत्पादन शुल्क विभाग करीत आहे. 4 मे रोजी नाशिकमध्ये दुपारी दोन वाजता मद्याची दुकाने उघडल्यानंतर हजारो तळीरामांनी मद्य घेण्यासाठी दुकानाबाहेर मोठी गर्दी केली. त्यामुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता. यानंतर अवघ्या 2 तासात मद्य विक्री बंद करण्यात आली होती.
नाशकात गर्दी टाळण्यासाठी टोकन पद्धतीने मद्यविक्रीची चाचपणी हेही वाचा-COVID-19: मुदत संपलेली वाहनांची कागदपत्रे वैध समजली जाणार - केंद्रीय वाहतूक मंत्रालय
जिल्हाधिकारी सुरेश मांढरे यांनी मद्यविक्री बंद करण्याचे आदेश दिले. मात्र, आता दुकानावर होणारी गर्दी टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने टोकन पद्धतीने मद्यविक्री करण्याची योजना आखली आहे. यामध्ये ग्राहकाला ठराविक टोकन किंवा चिठ्ठी दिली जाईल. यामध्ये ग्राहकाने स्वतःचे नाव, मोबाईल नंबर आणि मद्याची मागणी इत्यादी गोष्टी एका कागदावर लिहून दुकानदाराला द्यायच्या आहेत. त्यानुसार दर तासाला 50 ग्राहकांना मद्य विक्री केली जाऊ शकते. तसेच ज्या व्यक्तींनी टोकन भरले आहे पण मद्य मिळाले नाही त्यांना दुसऱ्या दिवशी मद्य मिळू शकणार आहे.
याबाबत राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक डॉ. मनोहर अनचूळे यांनी एक परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार ग्राहकांना सदर मागणी पत्राचा नमुना दिल्यानंतर त्यांना टोकन क्रमांक देण्यात यावा असे सांगितले आहे. जर टोपण उपलब्ध नसेल तर कोऱ्या कागदावर दुकानदाराने स्व:ताच्या दुकानाचा शिक्का व दूरध्वनी क्रमांक देऊन त्यांना अनुक्रमांक द्यावा. अशा पद्धतीने दर तासाला पन्नास ग्राहकांना सेवा देता येणार आहे. तर नंतर दुसऱ्या तासाला 51 ते 100 क्रमांक अशा आठ तासात जास्तीत जास्त चारशे लोकांना सेवा दिली जाऊ शकते, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
यातून गर्दी कमी होईल आणि सामाजिक अंतराचे पालन देखील होणार आहे. तसेच दुकानाबाहेर सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी, विभागातील निरीक्षक व दुय्यम निरिक्षक यांना झोनल ऑफिसर म्हणून विशिष्ट भागासाठी तात्काळ नेमावे. तसेच भरारी पथकातील अधिकाऱ्यांमार्फत त्या-त्या ठिकाणच्या मद्य विक्री दुकानाबाहेर गर्दी होणार नाही, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.