महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक लोकसभा मतदारसंघात रंगतदार लढत; युतीसह आघाडीला मतविभाजनाची धास्ती - समीर भुजबळ

नाशिक लोकसभा मतदारसंघातील लढत रंगतदार होत असल्याचे दिसत आहे. कारण भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांना वंचित बहुजन आघाडी व अपक्ष उमेद्वारांमुळे मतविभाजनाचा फटका बसणार आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात रंगतदार लढत

By

Published : Apr 27, 2019, 7:02 PM IST

नाशिक- नाशिक लोकसभा मतदारसंघातील लढत रंगतदार होत असल्याचे दिसत आहे. कारण भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांना वंचित बहुजन आघाडी व अपक्ष उमेद्वारांमुळे मतविभाजनाचा फटका बसणार आहे. याचीच धास्ती महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांनी घेतली आहे.

भाजपमधून बाहेर पडलेले माजी आमदार माणिकराव कोकाटे हे अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे मराठा समाजाचे पाठबळ असलेल्या कोकाटेंच्या उमेदवारीमुळे सेनेचे उमेदवार गोडसेंच्या मतावर परिणाम होऊ शकतो. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीकडून माजी नगरसेवक पवन पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भुजबळांना त्यांच्या मतांचे विभाजन होण्याची भीती आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात रंगतदार लढत

प्रचाराच्या शेवटच्या टप्यात सर्वच पक्षातील दिग्गज नेत्यांच्या सभांमुळे निवडणुकीचे वातावरण तापले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात १५ उमेदवार असले तरी खरी लढत महायुती आणि महाआघाडीमध्ये होणार हे स्पष्ट झाले आहे. कारण अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे ह्यांनी बोलण्यातून कितीही गाजावाजा केला तरी त्यांची झेप सिन्नर तालुक्यापर्यंत मर्यादित असल्याचे जाणवू लागले आहे. मराठा क्रांती मोर्चात त्यांचा सहभाग होता. त्यामुळे त्यांना थोड्याफार स्वरूपात मतदान पडेल. यामुळे कोकाटे महायुतीच्या मतांना खिंडार पाडणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांना २ समाजाच्या मतदानावर उमेदवारी देण्यात आली आहे. केवळ आघाडीचे अस्तित्व दाखवण्यासाठी कोणीतरी उमेदवार हवा आहे, म्हणून पवन पवार यांच्या गळ्यात उमेदवाराची माळ पडली आहे. शिवाय त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांना सुरुंग लावल्याचे बोलले जात आहे. ते जर ही मते आपल्याकडे वळवण्यात यशस्वी झाले, तर त्याचा फटका भुजबळांना बसण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळांनी मॅनेजमेंटचा वापर करत सुरवातीपासून शांतपणे प्रचाराला सुरुवात केली आहे. माजी मंत्री छगन भुजबळांचा पाठिंबा आणि खासदारकीच्या काळात केलेल्या कामाच्या बळावर समीर भुजबळ पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. स्वपक्षाबरोबरच मित्रपक्षांना बरोबर घेत त्यांनी प्रचार यंत्रणा कौशल्याने राबवली आहे. त्यांना चिंता आहे ती फक्त वंचित बहुजन आघाडीची.

मोदी आणि शहा राजकारणात नको, म्हणून भाजप आणि शिवसेनेला मतदान करू नका, असे मनसेने जनतेला सांगितले आहे. ही बाब राष्ट्रवादी काँग्रेसच्या पथ्यावर पडली आहे. त्यामुळे मनसेचा मतदार हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळाल्याचे चित्र आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details