नाशिक - लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वच उमेदवार मतदारांना खुश करण्यासाठी पैसा, दारू, पार्टी या गोष्टींचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसून येतोय. मात्र, आता या सर्व गोष्टीना पोलिसांकडून मोठी चपराक बसणार आहे. त्यासाठी नाशिक पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन हाती घेतले आहे. याबाबत नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
पाटील म्हणाले, की मतदानाच्या आदल्या दिवशी तसेच मतदानाच्या दिवशी काही झोपडपट्टी भागात पैसे वाटपासारखे गैरप्रकार होतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून स्टिंग ऑपरेशन करण्यात येणार आहे. यासाठी साध्या वेशातील पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अशा प्रकारचे गैरप्रकार आढळून आल्यास नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.