सटाणा(नाशिक) - बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील विकास शेवाळे कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. विकास शेवाळे हे मुंबईत पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. १५ दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
विकास शेवाळे यांनी “फानूस बनके जिसकी, हिफाजत हवा करे; शमा क्या बुझे, जिसे रोशन खुदा करे!” शायर मचली शहरी यांच्या या ओळी शब्दश: सार्थ ठरविल्या आहेत. विकास शेवाळे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी १५ दिवस कोरोनाशी चिवट झुंज देऊन, कोरोनावर मात करून विजयी मुद्रेने रुग्णालयाबाहेर पाउल ठेवले. यावेळी सर्व डॉक्टर्स आणि उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तसेच कॉलनीतील नागरिकांनी त्यांचे फुलांचा वर्षाव, टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
विकास आत्माराम शेवाळे हे मुंबई येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. कर्तव्यावर असतांना त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांचा पहिला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या पत्नीचेही रिपोर्ट पहिल्या अहवालात पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्याने सहाजिकच कुटुंबियांची अस्वस्थता वाढली. मात्र या योध्याने तीव्र इच्छाशक्ती सकारात्मकता व काळीज घेत पंधरा दिवसांच्या उपचारानंतर कोरोनाला हरवीत घरी परतले. या दरम्यान त्यांची तब्येत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अहवालांच्या दोन टोकांमध्ये हेलकावे खात होती. या दरम्यान विकास शेवाळे यांच्या तीन ते चार चाचण्या झाल्या. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असतांना कुठेतरी आशेचा किरण दिसला आणि पुन्हा आशा उंचावली. पुन्हा डॉक्टरांनी निरीक्षणाखाली ठेवले.