नाशिक - सिन्नर तालुक्यातील मुसळगावात एका कंपनीवर छापा टाकून तब्बल ३३ हजार ५०० लिटर अवैध बायाेडिझेल जप्त केले आहे. या कारवाईत मशिनरी, टँकर व अन्य सामुग्री असा एकूण २६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गाेपनीय माहितीच्या आधारे जिल्हा पाेलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने ही कारवाई केली.
नाशिकच्या सिन्नर औद्योगिक वसाहतीत बायोडिझेल पंपावर पोलिसांचा छापा, ३३ हजार लिटर बायोडिझेल जप्त
सिन्नर तालुक्यातील मुसळगावात एका कंपनीवर छापा टाकून तब्बल ३३ हजार ५०० लिटर अवैध बायाेडिझेल जप्त केले आहे. या कारवाईत मशिनरी, टँकर व अन्य सामुग्री असा एकूण २६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
२०/२० हजार लिटरचे दोन टॅंकर आणि साहित्य जप्त -
रमेश किसनराव कानडे, सुयोग रमेश कानडे, राजेंद्र बबन चव्हाण, अझर नुरमोहम्मद खान आणि अनिल महादू माळी अशी संशयितांची नावे आहेत. जिल्हयातील चाेरी-छुपे सुरु असलेल्या अवैध धंद्यांचे उच्चाटन व्हावे, यासाठी पोलिसांची कारवाई सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिन्नर एमआयडीसी पाेलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना पोलिस अधीक्षकांनी सोमवारी कारवाईचे निर्देश दिले. चौधरी यांनी सापळा रचून एमएच १५, एफव्ही ९९१० हा टँकर संशयास्पदरित्या कंपनीतून बाहेर पडताना दिसल्याने पाठलाग करून पकडला. त्याची तपासणी केली असता त्यात डिझेलसदृक्ष स्फोटक द्रव्य दिसून आले. पोलिसांनी चालकाची चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी मुसळगावातील ओमसाई बायो एनर्जी प्रा. लि. कंपनी मुसळगाव येथे छापा टाकला. तेथे २५ लाख ९९ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल तसेच २०/२० हजार लिटरच्या २ टॅंकर असा साठा आढळून आला आहे.
फर्निश ऑईल ऐवजी डिझेलसदृक्ष द्रव्य सप्लाय -
दरम्यान या प्रकरणी कंपनीचे मालक रमेश किसन कानडे यांच्याकडे चौकशी करता त्यांच्याकडे फर्निश ऑईलचा परवाना असल्याने ते ऑईलचे बिल तयार करून फर्निश ऑईल ऐवजी डिझेलसदृक्ष द्रव्य सप्लाय करताना आढळून आले. याबाबत जीवनावश्यक वस्तु कायदा कलम व स्फोटक अधिनियम कलम प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी करत असून ही कामगिरी पथकातील सहायक निरीक्षक पवार, पोलिस नाइक मरसाळे, शिंदे, धुमाळ, जाधव, सानप, निकम यांनी केली आहे.