नाशिक -मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुवर्णा वाजे यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या पतीने व त्याच्या साथीदारांनी त्यांना गाडीसह जाळून टाकल्याचे प्राथमिक तपासात समाेर आले आहे. दरम्यान, वाडीवऱ्हे पाेलिसांनी संशयित संदीप वाजे याला शुक्रवारी अटक करुन इगतपुरी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे.
कौटुंबिक वादातून पती संदीपने केली हत्या
सिडकाेतील मनपाच्या स्वामी समर्थ रुग्णालयात कंत्राटी तत्वावर वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉ. सुवर्णा संदीप वाजे (वय 34, रा. कर्मयाेगी नगर, गाेविंद नगर, नाशिक) यांची हत्या कौटुंबिक वादातून झाल्याचे समोर आले आहे. पती संदीप व त्याच्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने ही हत्या केल्याचे जिल्हा पाेलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी गुरुवारी स्पष्ट केले. वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत 26 जानेवारी राेजी जळालेल्या कारमध्ये एका महिलेचा सांगाडा आढळून आला होता. सांगाड्याची ओळख पटवणे शक्य नसल्याने पोलिसांनी डीएनए चाचणी केली. तसेच डॉ. वाजे यांच्या पतीसह इतर नातलगांकडे चौकशी केली. डीएनए चाचणीत आढळलेला मृतदेह डॉ. सुवर्णा वाजे यांचाच असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी संदीप वाजे याला प्राथमिक तपासानंतर अटक केली. वाजे हा कंन्स्ट्रक्शन ठेकेदार असून त्याचे व सुवर्णा वाजे यांचे कौटुंबिक कलह होते.
15 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
दरम्यान वाजेला अटक करुन न्यायालयात हजर केले असता पाेलिसांनी वाजेच्या या क्रूर कृत्यात मदत करणारे व त्याने हत्या कशी केला, कुणाची मदत घेतली, नियाेजन कसे केले, ज्वलनशिल पदार्थ कसे मिळवले. याचा तपास करण्यासाठी 15 दिवसांच्या पाेलीस काेठडीची (पीसीआर) मागणी वाडीवाऱ्हे पाेलिसांकडून करण्यात आली आहे. मात्र, न्यायालयाने सात दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे.
हेही वाचा -Nashik Crime News : नाशिकमध्ये महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला