नाशिक - शहरातील उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक संजय भोये यांनी घरगुती भांडणातून सावत्र मुलांवर गोळीबार केला आहे. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण रुग्णालयात उपचार घेत असताना मरण पावला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून संशयित आरोपी पोलीस नाईक संजय भोये यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नाशिकमध्ये पोलिसाचा सावत्र मुलांवर गोळीबार, दोन्ही भावंडांचा मृत्यू
नाशिकमध्ये आज बाप आणि मुलांमध्ये जोरदार भांडण झाले यामध्ये बापाने आपल्या मुलावरच गोळीबार केला आहे. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण रूग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू पावला. ही घटना नाशिक शहरात घडली. आरोपी पोलिसाला ताब्यात घेतले आहे.
अधिक माहिती अशी, पंचवटी भागातील अश्वमेध नगर येथे राजमंदिर इमारतीत उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक संजय अंबादास भोये यांच्यात आणि मुलांमध्ये भांडण झाले, हे भांडण इतके विकोपाला गेले की, वडिलांनी सावत्र मुलांवरच गोळीबार करत सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून ३ गोळ्या झाडल्या. यामध्ये सोनू नंदकिशोर चिखलीकर (वय २५) याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा मुलगा शुभम हा गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली.
अधिक माहितीनुसार सोनू चिखलीकर हा नौदलात कार्यरत होता, तर शुभम नाशिकमधील एका खासगी कंपनीत नोकरीला असल्याचे समजते. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून संशयित आरोप पोलीस नाईक संजय भोये यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.