नाशिक : जिल्ह्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यातील कंमाडोबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यातील कमांडोचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. कमांडो सुटीनिमित्त गावी आला असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. रात्री उशिरापर्यंत शोध मोहिम राबवत कमांडो गीते यांचा मृतदेह सापडण्यात प्रशासनाला यश आलं नव्हते. पुन्हा आज सकाळी शोधकार्य सुरू करण्यात आले आणि दुपारच्या सुमारास त्यांचा मृतदेह मिळाला मिळून आला आहे.
मोटरसायकल कोसळली कालव्यात : मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यातील एसपीजी कमांडो गणेश गीते हे 24 फेब्रुवारीला सुट्टीनिमित्त आपल्या गावी सिन्नर तालुक्यातील मेंढी येथे आले होते. गुरुवारी सकाळी ते पत्नी आणि मुलगा व मुलीसह शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. गीते कुटुंब नांदूरमधमेश्वर येथील उजवा कालव्यावरून घराकडे जात असताना गणेश गीते यांचा मोटरसायकलवरील ताबा सुटला आणि गीते यांचा मोटारसायकल थेट कालव्यात कोसळली.
पाण्याच्या वेगामुळे मृत्यू : कमांडो गणेश गीते यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि त्यांची दोन्ही मुले पाण्यात पडली. पत्नी आणि मुलगा बाजूला पडल्यानं त्यांना पटकन बाहेर काढण्यात आलं. दरम्यान मुलगी आणि गणेश गीते हे पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जात होते. त्यावेळी एका स्थानिकाने पाण्यात उडी घेत दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, बचावकर्त्याला मुलीलाच वाचवता आले. कालव्यात पाण्याचा वेग जास्त असल्याने कमांडो गणेश गीते यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.