नाशिक :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगभरात भारतीय संस्कृती पोहोचवली, म्हणून महर्षी पंचायतन सिद्धपीठमकडून महंत पीठाधीश्वर स्वामी अनिकेत शास्त्री देशपांडे महाराज आणि साहित्याचार्य यतीशचंद्र मिश्रा यांनी मोदींच्या यशस्वी कारकीर्दीवर श्लोक लिहिले आहेत. हे श्लोक ताम्रपटावर कोरून त्यांनी हा मोदी शतकम् नावाचा ताम्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिला आहे. हा ताम्रपट पाहून मोदीही भारावून गेले होते.
Gift To PM Modi: जगभरातून अनेक भेट वस्तू मिळत असतात, पण 'असा' ताम्रपट पहिल्यांदाच मिळाला- पंतप्रधान मोदी - पीठाधीश्वर स्वामी अनिकेत शास्त्री देशपांडे
नाशिकमधील महंतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक आगळी वेगळी भेट दिली आहे. त्यांनी मोदींना 100 श्लोकांचा आठ किलो वजनाचा ताम्रपट भेट दिला आहे. ही भेट पाहून मोदी भारावून गेले होते.
मोदींच्या यशस्वी कारकिर्दीवर 100 श्लोक : नाशिकचे स्वामी अनिकेत शास्त्री देशपांडे आणि यतीशचंद्र मिश्रा यांनी कोरोनामधील लॉकडाऊन काळात मोदींच्या यशस्वी कारकिर्दीवर 100 श्लोक रचले. नाशिकमधील दीपेश देशपांडे, सुजित जोशी आणि मिलिंद फडके या कलाकारांनी दीड महिना काम करून हे श्लोक ताम्रपटावर कोरले आहेत. श्लोक कोरलेला हा ताम्रपट तीन फूट बाय सव्वा दोन फूट आकाराचा व आठ किलो वजनाचा आहे.
पंतप्रधान मोदींची सर्वोत्तम कामगिरी :छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सर्वोत्तम कामगिरीचा सन्मान म्हणून ताम्रपट देण्याची परंपरा आहे. पंतप्रधान मोदींनी जगात संस्कृती, योग पोहोचविण्याचे काम केले आहे. भारतीय संस्कृतीचा डंका आज जगात गाजत आहे. त्यामुळे आम्ही हा ताम्रपट नाशिककरांच्या वतीने त्यांना अर्पण केला आहे, असे स्वामी अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी म्हटले आहे.
मोदींची प्रतिक्रिया :हा ताम्रपट स्वामी अनिकेत शास्त्री देशपांडे महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्यानंतर ते भारावून गेले होते. जगभरातून अनेक भेट वस्तू मिळत असतात, पण असा ताम्रपट पहिल्यांदाच मिळत आहे. अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. नाशिक ही धार्मिक, अध्यात्मिक नगरी आहे. या ठिकाणी दर बारा वर्षानंतर कुंभमेळा भरतो. त्यामुळे नाशिक येथे संस्कृत विश्व विद्यापीठ स्थापन करावे. काशी विश्वनाथ, उज्जैन महाकालेश्वराच्या धर्तीवर त्रंबकेश्वर येथे कॉरिडोर व्हावा. भारतातील सर्वात मठ आणि आखाड्यांमध्ये महिला साध्वींसाठी स्वतंत्र साध्वी भवनाची निर्मिती करावी, या मागण्यांचे निवेदन महंत देशपांडे यांच्या शिष्टमंडळानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले होते. आपण केलेल्या मागण्या समर्पक आहेत. लवकरच यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी दिली.
हेही वाचा :
- PM Narendra Modi Threaten Call : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बॉम्बस्फोटात उडवण्याची धमकी, पुण्यातील रुग्णालयाला विदेशातून ईमेल
- Ajit Pawar on PM Narendra Modi : 'पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा दुसरा नेता देशपातळीवर नाही'
- Sharad Pawar on Narendra Modi : शरद पवारांनी थोपटली नरेंद्र मोदींची पाठ, तर मोदींनी अजित पवारांची, मोदी-पवार बॉडीलँगवेजचा अर्थ काय?