नाशिक- राम मंदिराच्या मुद्यावर काही लोकांची फुटकळ बडबड असल्याचे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच राम मंदिर निर्माणाचा मुद्दा उकरून काढला होता. यालाच मोदी यांनी नाशिकच्या सभेत उत्तर दिले. आगामी विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला असतानाच मोदींच्या अशा फटकेबाजीमुळे युती होणार की वेगवेगळे लढणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राम मंदिरावर काहींची फुटकळ बडबड, मोदींचा सेनेला टोला - राम मंदिर news
राम मंदिराच्या मुद्यावर काही लोकांची फुटकळ बडबड असल्याचे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. नाशिक येथे मोदी बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या सभेत मोदी यांनी मागील ५ वर्षांत केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने केलेल्या कामाचा धावता आढावाच घेतला. लोकसभेत जनतेने सरकारच्या कामाची पावती दिली असून आता विधानसभेतही जनता भाजपला साथ देईल, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची तोंड भरून स्तुती केली. मात्र, महायुतीचे सरकार असतानाच मोदी यांनी मात्र शिवसेनेचा एकदा ही उल्लेख केला नाही. उलट सध्या राम मंदिराच्या मुद्यावर शिवसेनेला चांगलाच टोला लगावला. सेनेचे नाव न घेता काही 'बडबोल' लोक असा सेनेचा उल्लेख केला.
आमचा देशाच्या न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालयात या मुद्यावर आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी दाखवला. तसेच मोदी यांनी सेनेला आवाहन केले की त्यांनीही न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवावा. एकूणच शिवसेना आणि भाजपमध्ये जगावाटापावरून युतीचे चित्र अधांतरी असतानाच पंतप्रधान मोदी यांनी शिवसेनेलाच लक्ष केल्याने महायुतीवर काळे ढग जमा झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.