महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्लाझ्मा दलालांचा दहशतीचा प्रयत्न; खासगी रुग्णालयात बंदुकीतून गोळीबार - Sinnar Plazma agents terror

पोलिसांनी नाशिक शहरातून विकी जवरे व त्याचा दुसरा साथीदार शुभम धाडगे यास ताब्यात घेतले. त्यांच्याकडून नकली पिस्तूल पोलिसांनी हस्तगत केले आहे. याप्रकरणी सिन्नर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे.

सिध्दिविनायक रुग्णालय
सिध्दिविनायक रुग्णालय

By

Published : Apr 26, 2021, 4:47 PM IST

Updated : Apr 26, 2021, 5:06 PM IST

नाशिक -कोरोनाच्या संकटात प्लाझ्माची विक्री करणाऱ्यांनी दहशतही करण्यास सुरुवात केली आहे. सिन्नरच्या खासगी रुग्णालयात आलेल्या प्लाझ्मा एजंटने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यासाठी वापरलेली 2 पिस्तुलेही छऱ्याची असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी दोघांना सिन्नर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विकी जवरे व शुभम धाडगे अशी आरोपींची नावे आहेत.



सिन्नर येथील सिध्दिविनायक रुग्णायातील एका रुग्णाला तातडीने प्लाझ्माची गरज होती. रुग्णाच्या नातेवाईकांनी त्यासाठी शोध घेतल्यावर नाशिकमध्ये एका ठिकाणी प्लाझ्मा उपलब्ध झाला. मात्र, त्यासाठी 17 हजार रुपयांचा व्यवहार संबंधितांमध्ये ठरला होता. शनिवारी दुपारी ठरल्याप्रमाणे नाशिक येथून एक तरुण प्लाझ्माची बॅग घेऊन संबंधित रुग्णालयात आला. तेथे डॉक्टरांनी नातेवाइकांना बॅगसाठी किती पैसे दिले, याबाबत विचारणा केली. सर्वसाधारणपणे आठ हजारांच्या आसपास प्लाझ्मासाठी रक्कम देणे योग्य ठरेल. मात्र, आपत्कालीन परिस्थितीत त्या उपलब्ध झाल्याने दोन-चार हजार रुपये जास्त देण्यास हरकत नाही, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यामुळे ठरलेल्या 17 हजार रुपयांऐवजी रुग्णांच्या नातेवाइकांनी त्या तरुणाकडे केवळ 12 हजार रुपये दिले. त्यानंतर रात्री अकराच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी रुग्णालयात येऊन डॉक्टरांची विचारणा केली. डॉक्टर रुग्णालयात नसल्याने त्यांनी शिवीगाळ करत पिस्तुलातून एक बार उडवत काढता पाय घेतला.

खासगी रुग्णालयात बंदुकीतून गोळीबार

हेही वाचा-अमरावतीत दिपाली चव्हाण प्रकरणाची पुनरावृत्ती, वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून महावितरण कर्मचाऱ्याने घेतला गळफास

सिन्नर पोलिसांनी नाशिकमधून केली दोन तरुणांना अटक

या प्रकाराबाबत माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मुटकुळे यांच्यासह पथकाने रुग्णालयात धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेज बघितल्यावर त्या तरुणांनी एक पिस्तूल टेबलवर काढून ठेवल्याचे दिसून आले. त्यांच्या शोधासाठी लागलीच नाकाबंदी करण्यात आली. पोलिसांनी दुपारी प्लाझ्मा घेऊन आलेल्या तरुणांबद्दल माहिती मिळवत त्याचे नाशिक रोड येथील घर गाठले. मात्र, त्यांना घडल्या प्रकाराबद्दल कल्पना नव्हती. प्लाझ्मा सिन्नरला पोचविण्याचे व पेमेंट घेऊन येण्याचे एक हजार रुपये मला भेटले, असे त्याने सांगितले. त्याच्या माहितीवरून पोलिसांनी नाशिक शहरातून विकी जवरे व त्याचा दुसरा साथीदार शुभम धाडगे यास ताब्यात घेतले. त्यांच्याकडून नकली पिस्तूल पोलिसांनी हस्तगत केले आहे. याप्रकरणी सिन्नर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे.


हेही वाचा-मोफत लसीबाबतचे धोरण उच्चाधिकार समिती ठरवणार, आदित्य ठाकरेंच्या ट्विटमुळे संभ्रम


छऱ्यांच्या बंदुका घेऊन रुग्णालयात दहशत माजवण्यात आल्याने पोलिसांनी वेळीच अशा गावगुंडांचा बंदोबस्त करून कडक पावले उचलायला हवी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Last Updated : Apr 26, 2021, 5:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details