नाशिक - राज्य सरकारने पाडव्याच्या मुहूर्तावर आजपासून मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय घेतला. आज जिल्ह्यातील नांदगांव, येवला, चांदवड येथील मंदिर उघडली आहेत. सर्वधर्मीयांनी आणि छोट्या मोठ्या व्यवसायिकांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
गेल्या 17 मार्चपासून कोरोनाच्या महामारीमुळे राज्यभरात असलेली सर्वच देवस्थाने व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली होती. आता सर्व पूर्वपदावर येत असताना मंदिर देखील पूर्ववत सुरू करावी, यासाठी भाविकांनी सरकारकडे साकडे घातले होते. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सोमवारपासून सर्वच धार्मिक स्थळे खुली करण्याची घोषणा केली. यासाठी जिल्ह्यातील महत्वाचे असलेले चांदवड येथील रेणुका माता मंदिर येवल्यातील कोटमगाव व नांदगांव येथील नस्तनपूर ही मोठी धार्मिक स्थळे सुरू झाली.