जळगाव - जिल्ह्यात गेल्या हंगामात कपाशीवरील बोंडअळीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळण्यात यश आले. परंतू यंदा कापूस हंगामात प्रारंभीच जिल्ह्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यंदा कपाशीचे उत्पादन चांगले येण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र, निम्म्या जिल्ह्यात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कृषी विभागाला दिसून आला आहे. विशेषत: जामनेर, धरणगाव, चोपडा, बोदवड, अमळनेर, एरंडोल, यावल, पारोळा अशा आठ तालुक्यांतील सुमारे दीड लाख हेक्टरवर बोंडअळीने नुकसान करण्यास सुरवात केली आहे.
जिल्ह्यात सुमारे सात लाख ३९ हजार हेक्टरवर खरिपाची लागवड झाली आहे. त्यातील सव्वापाच लाख हेक्टरवर कपाशीची लागवड आहे. पैकी सव्वा ते दीड लाख हेक्टवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. कृषी विभागाचे कृषी सहाय्यक आणि पर्यवेक्षकांनी शेतात जाऊन केलेल्या निरीक्षणात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे. आतापासूनच शेतकऱ्यांनी बोंडअळीला नियंत्रणासाठी उपाय केल्यास आगामी काळात बोंडे खराब होऊन कपाशी वाया जाणार नसल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.