नाशिक - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने नाशिकच्या छत्रपती सेनेने आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. साडेतेरा फूट लांब आणि १२३ किलो वजन असलेल्या स्वराजाच्या भवानी तलवारीची त्यांनी प्रतिकृती साकारली असून आज(सोमवार) सकाळी या तलवारीचा अनावरण सोहळा पार पडला. सीबीएस परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर महाविद्यालयीन तरुणींच्या हस्ते याचे अनावरण करण्यात आले. यावेळी सरकारी वकील अजय मिसर, सुरगाणा घराण्याच्या सोनाली राजे भोसले यांच्यासह बिटको शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवजयंती निमित्ताने शहरातील सीबीएस परिसरात शिवाजी महाराजांचे गड किल्ले, शस्त्रास्त्रे यांच्या फोटोंचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन शिवजयंती पर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे. साडेतेरा फूट लांब आणि १२३ किलो वजनाची तलवार या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरत आहे. ही तलवार बनवण्यासाठी स्टील, लोखंड आणि पितळ या धातूंचा वापर करण्यात आला असून तिला बनवण्यासाठी २ महिने लागले आहेत. आजघडीला महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे मुलींना ही तलवार बघून त्यांच्यामध्ये धाडस निर्माण व्हावे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे छत्रपती सेनेकडून सांगण्यात येत आहे.