मनमाड (नाशिक) -कोरोनासारख्या महामारीत आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर हल्ले सुरूच आहेत. नांदगाव तालुक्यातील नांदगाव-चाळीसगाव चेक पोष्टवर कर्तव्यावर असरणाऱ्या २ पोलिसांवर पोलीस पाटील यांच्यासह एका पत्रकाराने टोळक्यासह येऊन मारहाण केली. तसेच त्यांच्या अंगावरील कपडे फाडण्याचा प्रकार रविवारी रात्री घडला. याप्रकरणी हल्लेखोरांविरोधात नांदगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहनांची तपासणी करणाऱ्या २ पोलिसांवर १५ ते २० जणांच्या टोळक्याने हल्ला करून मारहाण केली. त्यात अनिल शेरेकर आणि प्रदीप बागुल या पोलिसांना दुखापत झाली असून त्यांना नांदगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी नांदगांव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नातेवाईकांच्या वाहनांची तपासणी केल्याचा राग मनात धरून एका पत्रकाराने पोलीस पाटलांसह गावातील लोकांना गोळा करत टोळक्याने पोलिसांवर हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे.