नाशिक- पतसंस्थांचे अडकलेले पैसे ताबडतोब देण्याची मागणी करत पतसंस्था धारकांनी नाशिक जिल्हा सहकारी बँकेत धरणे आंदोलन केले. नोटाबंदी नंतर पतसंस्थांचे जिल्हा बँकेत 300 कोटी रुपये अडकून पडले आहेत.
महाराष्ट्र राज्य सहकारी कायद्यानुसार मध्यवर्ती सहकारी बँकेत रिझर्व्ह फंड, इमारत निधी ,चालू खाते या सारखी खाते उघडणे व ठेवी ठेवणे पतसंस्थांना बंधनकारक होते. त्यामुळे जिल्ह्यातील नागरी व बिगर शेती पतसंस्थांचे जवळपास २५० ते ३०० कोटी रुपयांच्या ठेवी, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील खात्यांमध्ये ठेवण्यात आली होती. नोटाबंदी झाल्यानंतर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजावर सरकारने बंदी आणली. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील बऱ्याच पतसंस्थांची रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेत अडकून पडली होती. मात्र, पैसे न मिळाल्याने पतसंस्थांना दैनंदिन कामकाज करताना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.