महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशकातील वाहनतळांच्या जागा बळकवणार्‍यांचा शोध सुरू; अतिक्रमणाविरोधात प्रशासन आक्रमक - parking

नाशिकमध्ये वाहनतळांच्या जागा बळकवणार्‍याचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली आहे. मुंढे यांनी सर्व्हेच्या माध्यमातून निम्मे नाशिक अनधिकृत असल्याचे समोर आणले होते त्यामुळे संपूर्ण नाशिक हादरून गेले होते. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व्हे करून नाशिकमध्ये अतिक्रमणाच्या विरोधात मनपा प्रशासन आक्रमक झाले आहे.

आयुक्त राधाकृष्ण गमे

By

Published : Jul 31, 2019, 10:11 AM IST

नाशिक- शहरातील वाहनतळाच्या जागेवरील अतिक्रमण धारकांवर आता महापालिका कारवाई करणार आहे. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नंतर नाशिकमध्ये आता आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी कठोर भूमिका घेतलीय. नाशिकमध्ये वाहनतळांच्या जागा बळकवणार्‍यांचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली आहे. मुंढे यांनी सर्व्हेच्या माध्यमातून निम्मे नाशिक अनधिकृत असल्याचे समोर आणले होते, त्यामुळे संपूर्ण नाशिक हादरून गेले होते. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व्हे करून नाशिकमध्ये अतिक्रमणाच्या विरोधात मनपा प्रशासन आक्रमक झाले आहे.

आयुक्त राधाकृष्ण गमे

नाशिक शहरातच नव्हे इतर अनेक मोठ्या शहरात देखील अतिक्रमणाचा राक्षस उभा आहे. त्यामुळे पार्किंगसारख्या भीषण समस्येला वाहनधारक आणि रहिवाशांना तोंड द्यावे लागते. त्यात सर्वाधिक महत्वाचा मुद्दा म्हणजे वाहनतळाची जागा नियमानुसार सोडणे आवश्यक असते. मात्र, तसे न होता अनेकांनी ती बळावून त्याचा दुरुपयोग केलाय. नाशिक शहरात अशी शेकडो प्रकरणे आहेत. त्यासाठी तुकाराम मुंढे यांनी पाहणी करून कारवाईची पाऊले उचलली होती. त्या सर्वेक्षणात शहरातील २ लाख ६९ हजार मिळकतीत अतिक्रमण झाल्याची माहिती न्यायालयात दिल्याचे समोर आले होते. त्यामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली होती. मात्र, लोकप्रतिनिधी आणि मुंढे यांचे खटके उडू लागल्याने मुंढे यांची तडकाफडकी बदली झाली होती. त्यामुळे त्या कारवाईला ब्रेक लागला होता. तसा तो सर्व्हेही वादग्रस्त ठरला होता. मात्र आता विद्यमान मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अतिक्रमणाच्या विरोधात कंबर कसलीय. अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून वाहनतळाच्या जागा बळकावणाऱ्यांचा शोध घेऊन दणका देणार आहेत.

सध्या नाशिक शहरात अतिक्रमण हा कळीचा मुद्दा बनला आहे. शहरात सोडा नाशिक मनपाच्या मुख्यालया समोरच नियमाला हरताळ फासला जात आहे. वाहनतळासाठी असलेल्या जागेवर अक्षरशः दुकानं थाटली आहेत. विशेष म्हणजे नगररचना विभागाला याची तक्रार येऊनही कानाडोळा केला जातो. हीच संधी साधत अनेक जन त्याचा फायदा घेतात. मात्र आता अशांना आयुक्त दणका देणार आहे. त्यामुळे नाशिककरांनो वेळीच अतिक्रमण केले असेल, तर काढून घ्या नाहीतर करवाईला सामोरे जावे लागेल.

ABOUT THE AUTHOR

...view details