नाशिक- कोरोना काळात खासगी शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले असून मागील वर्षच्या फीमध्ये 30 टक्के सवलत मिळावी, अशी मागणी पालकांनी नाशिकच्या सिल्व्हर ओक शाळेकडे केली आहे. मात्र, पूर्ण फी भरल्याशिवाय गुणपत्रिका मिळणार नाही, अशी भूमिका शाळेने घेतल्याने पालक वर्ग आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.
कोरोनामधील टाळेबंदीचा काळ सर्वांसाठी अडचणीत गेला. टाळेबंदीनंतरही अर्थचक्र सुरळीत झाले नसून अनेकांना आर्थिक मंदीचा सामना करावा लागत आहे. या काळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये यासाठी शासकीय शाळा सोबत खासगी शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिले. मात्र, शाळांनी विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने (प्रत्यक्ष) शिकवले असून अनेक महिने विद्यार्थी शाळेत गेले नसून फीमध्ये आकारण्यात आलेली इतर सुविधांमधून पैशात सूट मिळावी, अशी मागणी पालकांनी सिल्व्हर ओक शाळेकडे केली होती. मात्र, शाळेने पूर्ण वर्षाची फी भरावी असे म्हणत पूर्ण फी भरल्या शिवाय रिझल्ट (गुणपत्रिका) मिळणार नाही, अशी भूमिका घेतल्याने पालक आक्रमक झाले असून शाळेविरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.
30 टक्के फीमध्ये सवलत मिळावी
कोरोनामुळे वर्षभर शाळेच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिकवले आहे. मात्र, शाळा आम्हाला संपूर्ण वर्षांची 70 हजार रुपये फी भरण्यास सांगत आहे. या फीमध्ये वर्षीक संमेलन, सॅक्स आणि स्पोर्ट्स डे जे झाले नाही. त्याची फी सुद्धा आमच्याकडून शाळा मागत असून ती आम्ही भरणार नसल्याचे शाळेला कळवले आहे. फीमध्ये शाळेने 30 टक्के सूट द्यावी, अशी आमची मागणी असल्याचे पालक पल्लवी कोल्हे यांनी सांगितले आहे.