नाशिक- मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी जम्मू-काश्मीर येथून आलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवानाचा अपघातामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पंढरीनाथ राघो चौधरी, असे या जवानाचे नाव आहे. या जवानावर त्यांच्या मूळी गावी बागलाण तालुक्यातील मुळाणे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरीनाथ चौधरी हे गेल्या 10 वर्षापासून केंद्रीय राखीव पोलीस दलात सेवा बजावत होते. 24 फेब्रुवारीला मुलगा आयुषचा प्रथम वाढदिवस असल्याने 10 दिवसांची रजा टाकून चौधरी हे आपल्या गावी मुळाणे येथे आले होते. मुलाचा वाढदिवस कुटुंबियांसमवेत धुमधडाक्यात साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पंढरीनाथ चौधरी हे आपल्या बहिणीला भेटण्यासाठी कौतिकपाडे येथे जात होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला अपघात झाल्याने त्यांना गंभीर इजा झाली. त्यानंतर पंढरीनाथ यांच्यावर सटाणा येथील खासगी रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले. मात्र, मंगळवारी त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या निधनाची वार्ता पंचक्रोशीत समजताच परिसरातील नागरिकांचा मोठा जनसमुदाय त्यांच्या घराजवळ जमला होता.
हेही वाचा -नांदगाव तालुक्यात बंजारा समाजाच्यावतीने धुंड साजरी; बालकांचे केले नामकरण