नाशिकManoj Jarange Patil Painting:कोणताही कलाकार कला रेखाटताना आपण घेतलेल्या कलेच्या शास्त्रशुद्ध अद्ययावत शिक्षणाची जोपासना करत असतो; मात्र चित्रकार प्रदीप शिंदे याला अपवाद आहेत. (icon of Maratha community) कुठल्याही प्रकारचे चित्रकलेचे औपचारिक शिक्षण न घेता त्यांनी आता पर्यंत दीडशेहून अधिक रेखाचित्रे व पेंटिंग करून नावलौकिक मिळवला आहे. नाशिकच्या वडगाव पिंगळा या सिन्नर तालुक्यातील छोट्याशा गावात राहणाऱ्या प्रदीप शिंदे या कलाकारानं रेखाकला किंवा रंगकामाचं कुठलंही शिक्षण न घेता चित्रकला आत्मसात केली.
शिक्षक रवींद्र मालुंजकर यांचे मार्गदर्शन:प्रदीप शिंदेच्या घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे ते बारावीपर्यंत शिक्षण घेऊ शकले. त्यांचे आई-वडील छोटसं हॉटेल चालवतात. त्यावरच घराचा उदरनिर्वाह होतो. बारावीनंतर प्रदीपने सिन्नर येथे कारपेंटर आयटीआय करून प्रथम क्रमांक मिळवला. मात्र, त्यांना नोकरीची संधी मिळाली नाही. त्यावर निराश न होता शिक्षक रवींद्र मालुंजकर यांचे मार्गदर्शन घेत सिन्नर एमआयडीसीमध्ये एका कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कामावर रुजू झाले. परंतु, काही दिवसात ही कंपनी बंद पडली आणि प्रदीप यांच्यावर पुन्हा बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. मात्र हार न मानता त्यांनी नाशिकच्या आडगाव येथील दहावी-बारावी बोर्डच्या कार्यालयात सुरक्षारक्षक म्हणून नोकरी सुरू केली. सुप्रसिद्ध कवी रवींद्र सुमन मुकुंदराव मालुंजकर यांनी त्यांना 'आर्ट टीचर डिप्लोमा' हा 'कोर्स' करण्यासाठी सांगितले. या पदविका परीक्षेत प्रदीप शिंदे दोन्ही वर्षी प्रथम क्रमांक मिळवत पास झाले आणि तिथून सुरू झाला त्यांचा चित्रकाराचा प्रवास...