नाशिक - शहरातील खासगी हॉस्पिटलमधील ऑक्सिजन साठा संपल्याने कोरोनाबाधित पेशंटला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याने रुग्णांचे नातेवाईक हवालदिल झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात व्हेंटिलेटर ,ऑक्सिजन बेड आणि रेमडेसिवीर कमतरतेपाठोपाठ आता ऑक्सिजनचाही तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांचा जीव टांगणीला लागल्याचे चित्र आहे.
नाशिकमध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढत असून रोज 4 हजारहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत 35 हजारहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमधील बेड भरले आहेत. आता बेड पाठोपाठ नाशिक जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. नाशिक नामांकित सुविचार हॉस्पिटलमध्ये 20 ऑक्सिजन आणि 6 व्हेंटिलेटर बेडवर कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. ह्या ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने येथील रुग्णाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला नातेवाईकांना हॉस्पिटलकडून दिला जात आहे. मात्र, दुसऱ्या हॉस्पिटलमध्येसुद्धा बेड मिळत नसल्याने नातेवाईक हतबल झाले आहे.