नाशिक- जिल्ह्यात गरजेपेक्षा खूपच कमी ऑक्सिजनचा पुरवठा होत असल्याने आता डॉक्टरांनी शासनाच्या निर्देशानुसार रुग्णांना ऑक्सिजन द्यावा. अतिरिक्त ऑक्सिजन न देता त्याचा काटकसरीने वापर करावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी आयएमएच्या डॉक्टरांना दिल्या आहेत. पण डाॅक्टरांनी मात्र रुग्णांच्या प्रकृतीनुसारच आक्सिजन द्यावा लागतो. त्यापेक्षा कमी करता येत नाही. त्यामुळे जर उच्च दाबाचा (हायफ्लो) ऑक्सिजन उपलब्ध होत नसेल, तर असे व्हेंटीलेटरवरील रुग्णांबाबत, तसेच नवीन रुग्ण दाखल करुन घेण्याबाबत आता विचार करावा लागेल, अशी चिंता व्यक्त केली आहे. तसेच पुढील काळात जर मागणीनुसार ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही, तर परिस्थिती अजून गंभीर होण्याची शक्यताही असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
काटकसरीने ऑक्सिजना वापर करा -
ऑक्सिजन टँक लिक झाल्याने डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची हृदय पिळवटणारी घटना बुधवारी घडली होती. या घटनेचे घाव ताजे असताना आता गुरुवारी लागलीच शहरातील खासगी रुग्णालयांत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याचे पुढे आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ खासगी रुग्णालयांचे डॉक्टर्स, इंडियम मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर्स तसेच ऑक्सिजनच्या पुरवठदारांची बैठक घेतली. त्यात मागणीनुसार जिल्ह्यास ऑक्सिजन मिळत नसल्याने आपणच काटकसरीने आणि संनियंत्रण करत ऑक्सिजना वापर करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर आयएमएच्या पदाधिकाऱी डॉक्टरांनी यापूर्वीच सर्व पर्यायांचा अवलंब केला आहे. लिकेज पाईपलाईन, नव्या पाईपलाईन, कुठेही आक्सिजन व्यर्थ जाणार नाही याची काळजी घेतली आहे. वाढीव सिलिंडरदेखील उपलब्ध केले असून, सर्व उपाय योजना केल्याचे स्पष्ट केले.