नाशिक -कोरोनाबाधित रुग्णांना भेटण्यासाठी जाणारे नातेवाईकच शहरात सुपर स्प्रेडर म्हणून फिरत असल्याचे समोर आल्याने आता कोविड रुग्णालयात रुग्णांना भेटायला जाणाऱ्या नातेवाईकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी काढले आहेत.
बधितांना भेटायला जाणारे नातेवाईक सुपर स्प्रेडर -
नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव हा दुप्पट वेगाने होत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणेसोबतच सर्वसामान्य नागरिकदेखील भीतीच्या वातावरणात वावरत आहे. असे असताना आता कोरोनाबाधित रुग्णांना भेटायला जाणारे नातेवाईकच सुपर स्प्रेडर ठरत असल्याचे समोर येत आहे. कोरोनाबाधित रुग्णांना जेवण देण्यासाठी तसेच इतर कारणांसाठी हे नातेवाईक रुग्णांना भेटतात आणि त्यानंतर शहरात ते फिरत असल्याने यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता, आता अशा नातेवाईकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी घेतला आहे.