नाशिक : कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक हैराण झाले आहेत. याबाबत आज नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी रिअॅलिटी चेक करण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन घेण्यासाठी आलेल्या रुग्णांनाच्या नातेवाईकांशी चर्चा करून परिस्थिती जानून घेतली. त्यानुसार, ज्या रुग्णाला रेमडेसिवीरची गरज आहे आणि डॉक्टरांनी प्रमाणित केले आहे, अशा रूग्णांनाच हे इंजेक्शन दिले जाणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
या इंजेक्शनसाठी नागरिकांची रांग
उत्तर महाराष्ट्रातील हॉस्पिटल आणि मेडिकलला रेमडेसिवीरचा पुरवठा करणाऱ्या नाशिकमधील प्रमुख फार्मा बाहेर हे इंजेक्शन घेण्यासाठी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात या इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचाच परिणाम आज नाशिकमध्ये बघावयास मिळाला. राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि अचानक झालेला कोरोनाचा उद्रेक यामुळे हे भयावह चित्र निर्माण झाले आहे. अनेक नागरिक पहाटेपासून रांगा लावून फार्मा दुकानांबाहेर उभे आहेत.