नाशिक - वेळ वाचावा म्हणून नाशिक रोडच्या सलून व्यावसायिकाने एका ऑनलाइन शॉपिंग ॲपवरून फेशियल किट मागवले होते. मात्र, त्याला प्रत्यक्षात दगड मिळाल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागला. नाशिक रोडच्या डावखर वाडी परिसरात हा प्रकार उघडकीस आला आहे.
या कोरोनाकाळात लोक खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन शॉपिंगच्या पर्यायांकडे वळले आहेत. मात्र हीच ऑनलाइन शॉपिंग एका नाशिक रोडच्या सलून व्यावसायिकाला मनस्ताप देऊन गेली आहे. काही दिवसांपूर्वी नाशिक रोड भागातील जय भवानी रोडलगत असलेल्या डावखर वाडी या ठिकाणी सलूनचा व्यवसाय करणाऱ्या संजय निकम या व्यावसायिकाने 10 ऑक्टोबरला फ्लिपकार्ट ऑनलाइन शॉपिंग पोर्टलवरून जवळपास 767 रुपयांचे फेशियल किट मागवले होते. 18 तारखेला त्यांना याचे पार्सलदेखील आले. मात्र, सदर बॉक्स उघडून बघताच त्यांना धक्का बसला कारण त्या बॉक्समध्ये फेशियल किट नसून चक्क काँक्रिटचा दगड आला होता.