नाशिक : राज्यात कांद्यांच्या दरात घसरण झाल्यानंतर राज्य शासनानं शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार शासनानं जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला 3 ते 30 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागितले होते. या प्रस्तावाची शासकीय लेखापरीक्षकांनी तपासणी केल्यानंतर जिल्ह्यात 1 लाख 72 हजार 152 शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरले आहेत. या पात्र शेतकऱ्यांना थेट बँकेमार्फत अनुदान वर्ग करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचं काम सुरू असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलाणी यांनी दिली आहे.
कांदा दरात मोठ्या प्रमाणात घसरण :राज्यात या वर्षाच्या सुरुवातीला कांद्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची सरकारनं घोषणा केली होती. त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नाफेडकडं 1 फेब्रुवारी ते 31 मार्च या कालावधीत खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटल मदत करण्यात येणार होती. एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 200 क्विंटलपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनानं 27 मार्चला घेतला होता. त्यानुसार शेतकऱ्यांच्या प्रस्तावाची तपासणी शासकीय लेखापरीक्षकांनी केली आहे.