नाशिक - येथे कांद्याने गाठली शंभरी असून किरकोळ बाजारात कांदा १०० रुपये किलो दराने विकला जात आहे. गेल्या ८ दिवसांपासून बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटली असून परिणामी कांद्याचे भाव वाढले आहे. परिणामी नाशिक बाजार समितीमध्ये लाल कांद्याला ५ ते ६ हजार क्विंटल पर्यंत भाव मिळत असला तरी, दलाल आणि किरकोळ विक्रेत्यांकडून हाच लाला कांदा येथील किरकोळ बाजारात 100 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे सरळसरळ ग्राहकांची दिशाभूल करून लूट केली जात असल्याचे दिसून येत आहे. यातून शेतकऱ्यांना जरी २ पैसे मिळतं असले तरी ग्राहकांची मात्र लूट होत आहे. तर, सातत्याने भाव वाढत असल्याने गृहिणींचे आर्थिक बजट कोलमाडले आहे. परिणामी नागरिक कमी प्रमाणत कांदा खरेदी करत असून जिथे ग्राहक १ किलो कांदा खरेदी करत होते तिथे आता अर्धा किलो कांदा खरेदी करून समाधान मानत आहे.
कांद्याचे वाढलेले दर लक्षात घेऊन हे दर नियंत्रणात आणण्यासाठी १.२ लक्ष टन कांदा आयात करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात कांद्याचे दर नियंत्रणात ठेवून सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. कांद्याची वाढती मागणी लक्षात घेता, कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याची आयात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.