नाशिक - नांदगांव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. दर कोसळल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मनमाड बाजार समितीत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्याची मागणी करण्यात आली.
कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी संतप्त हेही वाचा - 'आमच्या हक्काचं पाणी द्या'; मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर पंकजा मुंडे आक्रमक
गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर सतत घसरत आहेत. शुक्रवारच्या तुलनेत आज क्विंटल मागे सरासरी १ हजार २५ तर जास्तीत जास्त १ हजार ४४ रुपयांची घसरण झाली. याविरोधात आज बाजार समिती आवारात शेतकऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. 'शेतकऱ्यांचा अंत पाहू नका अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल', असा इशारा यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी दिला.
हेही वाचा - VIDEO : दुचाकी वेगाने धावत नसल्याने तरुणाने दिली पेटवून
गेल्या आठवड्यात कांद्याला सरासरी ३ हजार ५२५ तर जास्तीत जास्त ३ हजार ८१५ रुपये इतका दर मिळाला होता. त्यात घसरण होऊन आज सरासरी २ हजार ५०० रुपये तर जास्तीत जास्त २ हजार ७७१ रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे.