नाशिक Onion Rate :उन्हाळी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटल्यानं नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सटाणा बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटर 5 हजार 550 रुपये सर्वाधिक भाव मिळाला. किरकोळ बाजारात ग्राहकांना 50 ते 55 रुपये किलोनं कांदा खरेदी करावा लागत आहे. दिवाळीपर्यंत कांद्याला 7 हजार क्विंटलपर्यंत भाव मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बाजारात लाल कांद्याचं आगमन :ऑक्टोबर महिन्यात बाजारात लाल कांद्याचं किरकोळ प्रमाणात आगमन झालं असून त्याला 3800 रुपये प्रतिक्विंटलचा भाव लासलगाव बाजार समितीत मिळाला. कमी पावसामुळे लाल कांदा बाजारपेठेत येण्यास उशीर होणार आहे. उन्हाळी कांद्याच्या दरात चारशे ते पाचशे रुपयांची वाढ होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाळीत साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाल्यानं जेमतेम उन्हाळी कांदा शिल्लक आहे. शिल्लक कांदा खराब होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. मे, जून, जुलैमध्ये अत्यंत कमी दरानं शेतकऱ्यांना कांदा विक्री करावा लागला होता. आता चांगला भाव जरी मिळत असला, तरी यातून जेमतेम उत्पन्न खर्च निघू शकेल, अशी परिस्थिती कांदा उत्पादकांची आहे.
कांदा क्षेत्रात घट :यंदा पावसानं दीर्घ ओढ दिल्यानं खरीप कांद्याचे रोप खराब झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव, देवळा, कळवण, चांदवड, येवला, सिन्नर, मनमाड या बाजार समितीमध्ये कांदा आवक मोठ्या प्रमाणात घसरली आहे. जिल्ह्यात लाल कांद्याची आवक झाली आहे. पावसा अभावी जिल्ह्यात कांदा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे आगामी कांदा आवक लक्षात घेता, शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्यानं उन्हाळी कांद्याची बाजार समितीमध्ये विक्री सुरू केली आहे.
- कांदा 100 रुपये किलोवर जाणार :लाल कांदा दिवाळीनंतर बाजारात येणार असल्याचं कृषी विभागांनं सांगितलं आहे. दिवाळीपर्यंत उन्हाळी कांद्याला 7 हजार रुपये क्विंटल इतका भाव मिळेल. तसचं ग्राहकांना सुद्धा 90 ते 100 रुपये किलो दरानं कांदा खरेदी करावा लागू शकतो, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.
येवल्यात 4200 प्रतिक्विंटल भाव :येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात बुधवारी झालेल्या कांदा लिलावात उन्हाळी कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी 4200 रुपये बाजारभाव मिळाला. येथील बाजारात जवळपास 300 ट्रॅक्टर आणि 247 रिक्षा पिकअपमधून 5 हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. बाजार समितीचे अंदरसूल उपमुख्य बाजार आवारात उन्हाळी कांद्याला प्रतिक्विंटल किमान 2000 ते कमाल सरासरी 4 हजार 150 रुपये याप्रमाणं बाजारभाव मिळाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा :
- सरकारने माकडचाळे थांबवावेत, राजू शेट्टींचा इशारा; कांदा खरेदीसाठी केली 'ही' मागणी
- Onion Seller Farmers : नाफेडने कांदा खरेदीसाठी लादल्या जाचक अटी; शेतकरी अडचणीत