नाशिक - गेल्या दहा दिवसापासून बंद असलेली येवला कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून सुरू झाली. कांदा, मका व भुसार धान्य लिलाव आजपासून सुरळीत सुरु झाला. दिवाळीची सुट्टी तसेच व्यापाऱ्यांनी दिलेल्या अर्जानुसार, येवला कृषी उत्पन्न बाजार समिती व अंदरसुल कृषी उत्पन्न उपबाजार समितीमध्ये कांदा, मका व भुसार धान्य लिलाव सलग दहा दिवस बंद होते.
येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव आज पासून सुरु शेतकऱ्यांना मिळाला दिलासा -
लिलाव सुरू झाल्यानंतर कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 3500 ते 3800 रुपये इतका भाव मिळत आहे. अनेक दिवसांपासून बाजार समित्या बंद असल्याने शेतकऱ्याना कांदा, मका, भुसार धान्य विकता येत नव्हते. मात्र, आजपासून बाजार समित्या सुरु झाल्याने शेतकऱ्यांना मिळाला दिलासा मिळाला आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ -
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव हे आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि येवल्यातील कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद केला होता. त्यामुळे बाजार समित्या बंद होत्या. मागील एक महिन्यापासून कांद्याचे दर वधारले आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे दर जवळपास 90 ते 100 रुपयांपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे कांदा आहे, त्यांना मोठा आर्थिक फायदा झाला. मात्र केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली. तसेच आयकर विभागाने व्यापाऱ्यांवर छापे टाकत त्यांच्याजवळील कांदा साठवणूकीवर निर्बंध घातले. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
हेही वाचा -मनमाड शहरात गवळी बांधवांनी रेड्यांची झुंज लावून केली दिवाळी साजरी