नाशिक-कांदा निर्यातबंदी, व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने टाकलेले छापे आणि आता साठवणुकीवर घातलेले निर्बंध याच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यांमधील कांदा लिलाव सलग दुसऱ्या दिवशी बंद असल्याचे बघायला मिळाले.
केंद्र शासनाने लागू केलेल्या कांदा निर्यात बंदीचा निर्णय, यापाठोपाठ कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने टाकलेले छापे आणि आता व्यापाऱ्यांना कांदा साठवणूकीवर घालून दिलेले निर्बंध या त्रिसूत्री निर्णयाच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत काळासाठी लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी जिल्ह्यातील जवळपास पंधरा बाजार समित्यांमधील लिलाव बंद ठेवल्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी देखील सर्वच बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद असल्याचे बघायला मिळाले. सोमवारी जिल्ह्यातील प्रमुख 15 ही बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांनी कांदा लिलावात सहभाग न घेतल्याने, लिलावासाठी आणलेला कांदा शेतकऱ्यांना माघारी घेऊन जावा लागला होता. व्यापाऱ्यांच्या भूमिकेमुळे बाजार समित्यांमध्ये होणारी जवळपास एक लाख मेट्रिक टन कांद्याची आवक थांबून सुमारे पाच कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी देखील हे लिलाव बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव सुरू करण्याबाबत आज सहाय्यक निबंधकांनी कांदा व्यापाऱ्यांची बैठक घेतली; परंतु कोणताही तोडगा न निघाल्यामुळे बैठक निष्फळ ठरली आहे. सणासुदीच्या काळात लिलाव बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.