नाशिक - दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे कोरोना सदृश्य रुग्ण आढळल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मोहाडी येथील एकजण २ दिवसांपूर्वी अमेरिकेवरुन गावी परत आल्यानंतर त्याला सर्दी खोकला घसे दुखीची वेदना जाणवू लागली. त्यांना जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्याणी बुनगे यांनी जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सदर संशयित रुग्णाचे नमूने पुणे येथे पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल गुरुवारी प्राप्त होणार असल्याचे डॉ. बुनगे यांनी सांगितले.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता तहसीलदार कैलास पवार यांनी सर्व अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आणि याबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन केले. तसेच, खोट्या अफवा पसरविण्यात कडक कारवाई करण्याचा इशारा दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांनी दिला. यावेळी मंडळ अधिकारी राजेंद्र विधाते, तलाठी साहेबराव भामरे, ग्रामविकास अधिकारी सुधाकर जगताप, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याणी बुणगे, पर्यावरण संरक्षण संस्थेचे तालुकाध्यक्ष विलास पाटील, डॉ. छगन लोणी, डॉ. कल्पेश चोपडे, जिल्हा परिषद माजी गटनेते प्रवीण जाधव , माजी उपसरपंच कैलास कळमकर, ह्युमन राईट जिल्हा सचिव संतोष निकम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आव्हाड, जयश्री जाधव, पल्लवी ठाकरे, सतीश पोटींदे, मनोज पोटींदे, संजय वाघ, संतोष गांगुर्डे, सुनील जाधव आदी उपस्थित होते.