सटाणा(नाशिक) -बागलाण तालुक्यातील जायखेडा, जयपूर, सोमपूर या गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. मंगळवारी आणखी एक कोरोना रुग्ण आढळल्याने येथील रुग्णांची संख्या आता १२ झाली आहे. मृत कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील 11 जण कोरोनाबाधित आढळले होते. वाडीपिसोळ या छोट्या गावात अजून १ कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याने परिसरातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. यामुळे शहरी भागानंतर ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार झाल्याचे चित्र आहे. दोन महिन्यांपासून बागलाण तालुका कोरोनामुक्त होता.
बागलाण तालुक्यातील जायखेडा गावात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने प्रशासनाने सतर्कतेसाठी गावात कंटेनमेंट झोन जाहीर केला आहे. जायखेडा गावात पोलीस बंदोबस्तात अधिक वाढ करण्यात आली आहे. सोमवारी क्वारंटाइन केलेल्या १२ व्यक्तीपैकी एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. जायखेडा येथील इतर ११ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून त्यांना होम क्वारंटाईन राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.