नाशिक -नाशिकचा जिल्हा शासकीय रुग्णालयातून एका दीड वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या नातलगांना भेटण्यासाठी आई सोबत आलेल्या चिमुकलीचं अज्ञात इसमाने अपहरण झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
नाशिकच्या शासकीय रुग्णालयातून चिमुरडीचे अपहरण; घटना सीसीटीव्हीत कैद
नाशिकच्या शासकीय रुग्णालयातून दीड वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडली. ही संपुर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी अज्ञात अपहरणकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीला पळवून नेल्याने रुग्णालयात खळबळ-
नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून एका बालकाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारच्या सुमारास घडली. संगीता भोला गौड ही महिला तिचा बहिणीला बाळंतपणासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी आली होती. यावेळी प्रतिभा गौड ही दीड वर्षाची चिमुकली झोपलेली असल्याने तिचा आईने शेजारी बसलेल्या एका इसमाला या मुलीकडे लक्ष देण्यास सांगून रिपोर्ट सादर करण्यासाठी आतल्या खोलीत गेली. मात्र याचवेळी त्या इसमाने त्या मुलीला खांद्यावर टाकून पळवून नेल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान या चिमुकलीच्या अपहरणाचा सर्व प्रकार रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
डीबी पथकाचा शोध सुरू-
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना जिल्हा रुग्णालयात बोलावून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सीसीटीव्ही फुटेज मिळताच पोलिसांनी या इसमाचा रुग्णालय, बस स्थानक आणि परिसरात डिबी पंथकाने शोध सूरु केला आहे
रुग्णालयातील ढिसाळ कारभारामुळे घडली घटना -
सकाळच्या सुमारास अपहरन झालेल्या मुलीचे नातेवाईक जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल होण्यासाठी आले होते. मात्र रुग्णालयातील ढिसाळ कारभारामुळे ऍडमिट होण्यासाठी सकाळची दुपार झाली आणि दुर्दैवाने ही घटना घडली आहे. जिल्हा रुग्णालयाने वेळीच उपचारासाठी दाखल करून घेतले असते. तर ही घटना घडली नसती असाही आरोप अपहरण झालेल्या मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. सुदैवाची बाब म्हणजे नाशिक जिल्हा रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे आजच कार्यान्वित करण्यात आले होते. त्यामुळे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान या सीसीटीव्हीच्या आधारावरच चिमूकल्या मुलीचं अपहरण करणाऱ्याला भामट्याला शोधण्याचा मोठे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.
हेही वाचा-पूजा चव्हाण प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया