महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुट्टीवर असतानाही नाशिकच्या पोलिसाने दाखवली चतुराई, पत्नीच्या मदतीने अट्टल चोरटे गजाआड

गुलाब सोनार हे सुट्टीवर असताना आपल्या कुटुंबासमवेत वैयक्तिक कामासाठी पुणे येथे गेले होते. तेथून परतत असताना त्यांना दुचाकीवरून जाणाऱ्या दोन व्यक्तींचा संशय आल्याने त्यांनी त्यांच्या कार्यालयाच्या व्हाट्सअप ग्रुपवर असलेल्या दोघा संशयित सोनसाखळी आरोपींबद्दल माहिती जाणून घेतली. हेच ते दोन सोनसाखळी चोर असल्याची खात्री पटल्यानंतर....

नाशिक
नाशिक

By

Published : Oct 15, 2020, 5:20 PM IST

नाशिक - गुन्हे शाखेत कार्यरत असलेले गुलाब सोनार हे आपल्या कुटुंबासमवेत पुण्याहुन नाशिककडे येत असताना त्यांनी सराईत सोनसाखळी चोरांचा सिने स्टाईल पाठलाग करून अटक केली. सोनार यांनी दाखवलेल्या धाडसामुळे पोलीस विभागाकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चोरांना पकडण्यात सोनार यांना पत्नी ज्योती आणि त्यांच्या साडू यांची मोठी मदत झाली.

सुट्टीवर असतानाही नाशिकच्या पोलिसाने दाखवली चतुराई, पत्नीच्या मदतीने अट्टल चोरटे गजाआड
नाशिकमध्ये गेल्या महिन्याभरापासून सोनसाखळी चोरांनी उच्छाद मांडला आहे. वारंवार होणाऱ्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे पोलिसांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. नाशिकच्या गुन्हे शाखा क्रमांक 3 मध्ये कार्यरत असलेले गुलाब सोनार हे सुट्टीवर असताना आपल्या कुटुंबासमवेत वैयक्तिक कामासाठी पुणे येथे गेले होते. तेथून परतत असताना त्यांना दुचाकीवरून जाणाऱ्या दोन व्यक्तींचा संशय आल्याने त्यांनी त्यांच्या कार्यालयाच्या व्हाट्सअप ग्रुपवर असलेल्या दोघा संशयित सोनसाखळी आरोपींबद्दल माहिती जाणून घेतली. हेच ते दोन सोनसाखळी चोर असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी याची माहिती नाशिकच्या गुन्हे अधिकाऱ्यांना दिली. सोनारनी माहिती दिल्यानंतर तत्काळ नाशिकहुन एक पथक पुण्याच्या दिशेने रवाना झाले. इकडे सोनार यांनी देखील आपल्या कुटुंबातील पत्नी आणि इतरांना विश्वासात घेत चोरांना पकडण्याची योजना आखली आणि 30 किलोमीटरचा पाठलाग करून आरोपींवर झडप घालत त्यांना अटक केली.

हेही वाचा -नाशिकमध्ये वाचनालये सुरू, पहिल्याच दिवशी सार्वजनिक वाचनालयात वाचकांची गर्दी

सोनार यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या पत्नीने या चोरांना पकडून ठेवले आणि आरडा-ओरडा करून लोकांना जमा केले. विशेष म्हणजे या आरोपींकडे धारदार शस्त्रास्त्रे असताना देखील ज्योती सोनार यांनी धाडसाने त्यांना पकडून ठेवले. आरोपींकडून चोरीच्या सहा सोन साखळ्यांसह चाकू, तलवार हे धारधार शस्त्र देखील मिळून आले आहेत. गेल्या काही वर्षांपासून पोलीस या दोन्ही आरोपींच्या मागावर होते. राजू उर्फ राजाराम खेटू राठोड (हडपसर) आणि नागेश बडवर (बेळगाव) या आरोपींनी आतापर्यंत मुंबई, सोलापूर, पुणे, सातारा या भागात सोनसाखळी चोरी केली आहे. सोनार दाम्पत्याने जिवाची पर्वा न करता दाखवलेल्या धाडसाचे सध्या शहरात कौतुक होत आहे.

हेही वाचा -लासलगावातील कांदा व्यापाऱ्यावर आयकर विभागाचे छापे; बाजार समितीतील लिलाव बंद

ABOUT THE AUTHOR

...view details