महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देवळाली कॅम्प येथील दोनवाडेमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचा मृत्यू - nashik latest news

देवळाली कॅम्प येथील दोनवाडे येथे बिबट्याच्या हल्ल्यात जीवराम ठुबे या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पाच दिवसांपूर्वी बिबट्याने एका 4 वर्षाच्या मुलीवर हल्ला केल्याची घटना घडली होती. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने ठिकठिकाणी पिंजरे लावावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

old man died in devlali
बिबट्याच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू

By

Published : Jun 15, 2020, 1:05 PM IST

नाशिक-तालुक्यातील देवळाली कॅम्प जवळील दोनवाडे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्ती ठार झाल्याची घटना घडली आहे. जीवराम गोविंद ठुबे (७६) असे मृत वृद्धाचे नाव आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास जीवराम ठुबे हे त्यांच्या शेतात झोपलेले होते. त्यावेळी बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला.

गेल्या महिनाभरापासून राहुरी, मोहगाव, देवळाली कॅम्प, भगूर, नानेगाव, शेवगे दारणा, पळसे,या दारणा काठच्या गावात बिबट्याचा वावर वाढला आहे. पाच दिवसांपूर्वी नाशिक जवळच्या शिंगवे दारणा परिसरात 4 वर्षाच्या चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केला होता. यावेळी त्या मुलीच्या आजीच्या दक्षतेमुळे तिचा जीव वाचला होता. यामुळे भागातील नागरिक भयभीत झाले आहेत. वन विभागाने ठिकठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

वन विभागाच्या सर्वेक्षणानुसार नाशिक जिल्ह्यातील गोदावरी, दारणा, कादवा या नदीच्या लगतच्या क्षेत्रात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. दिंडोरी,निफाड,सिन्नर,भगूर,देवळाली कॅम्प या भागात बिबट्यांची संख्या मोठी आहे. या भागात मुबलक पाणी, भक्ष्य आणि विशेष म्हणजे लपण्यासाठी ऊस क्षेत्र असल्याने बिबट्यांचा वावर इथे मोठ्या प्रमाणात आहे. नाशिक जिल्ह्यात 230 ते 240 बिबटे आल्याचा अंदाज आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details