नाशिक - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून जनमानसात याचे अनेक परिणाम झाले आहेत. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ऐच्छिक रक्तदात्यांवर याचा परिणाम झाला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे अनेकजण रक्तदान करण्यासाठी पुढे येत नसल्याने रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. दररोज 40 ते 50 जणांना रक्त पिशवी मिळत नसल्याने रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.
नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 13 हजारांवर गेला असून आत्तापर्यंत 499 जणांचा मृत्यू झाला आहे. लॉकडाऊन काळात बंद असणारे व्यवसाय, उद्योग अद्याप पूर्णपणे पूर्वपदावर आलेले नाहीत. महाविद्यालये, धार्मिक स्थळे बंद असून अनेक कंपन्यांमध्ये कमी कामगारांना घेऊन काम होत आहे. याचाही परिमाण रक्तदात्यांवर झाला आहे. नाशिकच्या औद्योगिक भागात, महाविद्यालयात आणि धार्मिक स्थळांमध्ये होणारी रक्तदान शिबिरे सध्या बंद आहेत. याचा परिमाण रक्त पुरवठ्यावर झाला आहे.
नाशिकमधील सर्वात जुनी रक्तपेढी असलेल्या 'अर्पण रक्तपेढीत' दर महिन्याला रक्तदानाच्या माध्यमातून 2 हजार 400 ते 2 हजार 500 रक्तपिशव्या जमा होत असत. मात्र, मागील तीन महिन्यापासून याठिकाणी 500 ते 600 रक्तपिशव्यांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रोज 40 ते 50 जणांना रक्त पिशवी मिळाली म्हणून परत फिरावे लागत आहे. A निगेटिव्ह, B निगेटिव्ह, AB निगेटिव्ह आणि O निगेटिव्ह गटाच्या रक्तपिशवींचा तुटवडा अधिक आहे.