नाशिक - उन्हाच्या झळा तीव्र होत असल्याने धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी-कमी होत आहे. सद्या नाशिक जिल्ह्यातील २४ धरणांमध्ये ३४ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. गेल्यावर्षी या दिवसांत हे प्रमाण ३९ टक्के इतके होते. दरम्यान या उपलब्ध पाणीसाठ्यावरच पावसाळ्यापर्यंत जिल्ह्यातील नागरीकांची तहान भागणार आहे. तरी या पाणीसाठ्याचे योग्य नियोजन प्रशासनाला करावे लागणार आहे.
मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस
मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात पावसाने शंभर टक्के हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांत समाधानकारक पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यातील बरेच धरणं, नद्या दुथडी भरून वाहत होते. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्याच्या झळा जास्त जाणवल्या नाही. दरम्यान रब्बीच्या हंगामासाठी व इतर उद्योगांसाठी हे पाणी वापरले जाते. सध्या नाशिक शहराची तहान भागविणार्या गंगापूर धरणात ४९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. आता मे महिन्याचा पंधरवडा सुरू झाला असून उन्हाच्या तीव्र झळा जाणवायला लागल्या आहेत.
नदी-नाले आटले
नदी-नाले अटले असून विहीरीही कोरड्या पडल्या आहेत. आता ग्रामीण भागात अनेक वाडया-वस्त्यांवर पाणी टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची पायपीट होत आहे. सध्या धरणांतून पिण्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र, रोज पडणाऱ्या कडक उन्हामुळे या धरणांतील पाणीसाठा रोज कमी-कमी होत आहे. यंदा मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. परंतु, दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता मान्सूनच्या आगमनला जुलै अखेर होते. याचा विचार करून आता आहे त्या पाणीसाठा योग्य पध्दतीने कसा वापरता येईल याचे नियोजन जिल्हा प्रशासनाला करावे लागणार आहे.