नाशिक :राज्यातील कोणताही कष्टकरी, गरीब व्यक्ती उपाशीपोटी झोपू नये, यासाठी महाविकास आघाडीने सरकारने सुरू केलेली शिवभोजन थाळी अजूनही सुरू आहे. परंतु नाशिक जिल्ह्यातील केंद्र संचालकांचे सुमारे सहा महिन्यांचे एक कोटी रुपयांची बिले थकल्याने केंद्र चालकांवरच उपासमारीची वेळ आली आहे. राज्यातील सरकार बदलताच याचा फटका शिवभोजन थाळी चालकांना कशासाठी? असा प्रश्न या निमित्ताने केला जात आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण 92 केंद्र आहे. त्यातील 45 केंद्र शहरातच आहे. शहरातील केंद्रांना देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो, कारण रोजगारासाठी शहरात येणाऱ्या कष्टकऱ्यांची संख्या अधिक आहे. राज्यातील सरकार बदलल्यानंतर आता शिवभोजन केंद्राची बिले मिळत नाही. गेल्या सहा महिन्याची बिले मिळाली नसून केंद्र कशी चालवावी? असा प्रश्न निर्माण झाल्याचे केंद्र चालकांचे म्हणणे आहे.
काय आहे योजना :राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर त्याला गती मिळाली. तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. गरीब, विक्रेते, कष्टकरी यांना अवघ्या दहा रुपयात भोजन मिळत असल्याने या योजनेला आजही चांगला प्रतिसाद ही मिळात आहे. जिल्ह्यात केंद्र चालकांना ठरवून दिलेल्या उद्दिष्टानुसार सुमारे साडेअकरा हजार थाळ्या रोज विकल्या जातात. दरम्यान केंद्र चालकांकडून ही योजना सुरू असताना राज्यातील सत्तांतर झाले. त्यानंतर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिक शहरातच काही केंद्रांना भेटी देखील दिल्या. शिवभोजन केंद्र चालकांनी अनेकदा दादा भुसे यांची भेट घेऊन त्यांना अनुदान मिळावे, यासाठी निवेदनही दिले. मात्र अद्याप त्यांचा प्रश्न सुटलेला नाही.