नाशिक- शहरासह सटाणा, येवला, कळवण, चांदवड, दिंडोरी, पेठ, सुरगाणा आणि निफाड तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या पावसानंतर शनिवारी दुपारी पावसाने हजेरी लावली असून हा पाऊस जिल्ह्यातील खरीप पिकाला जीवदान देणारा ठरेल यामुळे शेतकऱ्यांसमोरील दुबार पेरणीचे संकट टळणार आहे.
नाशिक जिल्ह्यात आठवडाभर पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या. तीन-चार दिवस वातावरणात उकाडा जाणवत असल्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र, आता पावसाने दमदार हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला.
कळवण शहर व परिसरात पडत असलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण असून दुबार पेरणीचे संकट टळले आहे. पेरणी झाली नाही अशा ठिकाणी पेरणी करण्याची संधी आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. पावसाचा तालुका म्हणून ओळख असलेल्या कळवण मध्ये गेल्या महिन्यापासून पाऊस नव्हता, त्यामुळे शेतकरी संकटात सापडला होता.
अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसायला सुरुवात झाली होती, त्यामुळे तालुक्यातील गावांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पाऊस पडावा यासाठी नागरिक होमहवन, पूजा, जागर, सामुहिक नमाज पठण असे उपक्रम राबवून देवाला पाऊस पडावा म्हणून साकडे घालत होते. मात्र, काल रात्री पासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे.