नाशिक- शहरातील नागरिकांना आता खरेदीसाठी बाजारपेठेत जाताना टोल द्यावा लागणार आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी आणि बाजारपेठेत होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी नाशिक महानगरपालिका आणि पोलिसांनी अनोखी शक्कल लढवत हा उपक्रम हाती घेतला आहे.
बाजारपेठेत जाण्यासाठी प्रति तास ५ रुपये प्रतिव्यक्ती आकारले जाणार
नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये होत असलेली गर्दी पाहता आता ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी नाशिक महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने एक नवीन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत आता बाजारपेठेत जाण्यासाठी प्रति तास पाच रुपये प्रतिव्यक्ती आकारले जाणार आहेत. तसेच एक तासापेक्षा जास्त वेळ बाजारपेठेमध्ये रेंगाळणार्या नागरिकांकडून पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. शहरात कोरोनाचा उद्रेक झाला असून स्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन नाशिक महापालिका आणि पोलीस प्रशासनाने कठोर पावले टाकायला सुरुवात केली आहे.
बेजबाबदारपणाला लगाम घालण्यासाठी मनपा आणि पोलिसांनी कसली कंबर
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या झपाट्याने वाढत आहे. यात नाशिक शहर हे जिल्ह्यातील कोरोनाचा सर्वाधिक मोठा हॉटस्पॉट म्हणून समोर आले. मात्र तरीही नागरिकांकडून सर्रासपणे कोरोना नियमांचे उल्लंघन केले जात असल्याने आता पोलीस प्रशासन आणि मनपा प्रशासनाने या बेजबाबदार नागरिकांना लगाम घालण्यासाठी कंबर कसली असून पोलिसांच्या या अनोख्या उपक्रमामुळे आतातरी नागरिक दंडाच्या भीतीने का होईना पण नियमांचे पालन करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तर सध्या प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आलेला हा उपक्रम लवकरच संपूर्ण शहरात राबविला जाणार असल्याने नागरिकांनी आता तरी कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेत जबाबदार पणे वागायला हवे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा -भुजबळांनी स्वतः केली बीअर बारवर कारवाई, कोरोना नियम मोडणारे हॉटेल्स-बार सील
हेही वाचा -मनमाड जंक्शनची तऱ्हा.. जिवंतपणीच नाही, तर मृत्यूनंतरही सोसाव्या लागताहेत पाणी टंचाईच्या झळा..!