नाशिक -माजी आमदार निशिगंधा मोगल यांनी भारतीय सैन्याला तब्बल 20 लाखांचे सोन्यांची रक्कम मदत म्हणून देऊ केली आहे. स्रीधनातील एवढी मोठी रक्कम भारतीय सैन्याला देणाऱ्या निशिगंधा मोगल या देशातील पहिल्या महिला राजकारणी ठरल्या आहेत.
निशिगंधा मोगल यांची प्रतिक्रिया महिलांना सर्वात जास्त आवडतात ते म्हणजे सोन्याचे दागिने. मात्र, तब्बल 20 लाख रुपये किंमतीचे सोन्याची रक्कम माजी आमदार निशिगंधा मोगल यांनी कारगील आणि सीमेवर लढणाऱ्या जवानांना अर्पण करत सर्व राजकीय पक्षांसामोर एक आदर्श निर्माण केला आहे.
कोण आहेत निशिगंधा मोगल जाणून घेऊया...
निशिगंधा मोगल या नाशिक शहरातील माजी आमदार आहेत.1996 ते 2002 मध्ये त्या भाजपच्या विधान परिषदेच्या महिला आमदार म्हणून कार्यरत होत्या. शिवाय 6 वर्षात आलेला सर्व आमदार निधी त्यांनी महिलांच्या कामांसाठी वापरला आहे. त्यांनी भाजप पक्षातील अनेक राज्य तसेच राष्ट्रीय पदावर काम केले. यात भारतीय जनता पार्टी महिला प्रदेश उपाध्यक्ष, सरचिटणीस अशा पदावर काम केले आहे. तसेच संघाच्या कार्यातदेखील त्यांचा सहभाग राहिला आहे. मोगल यांनी भाजपचे जेष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत बीजेपीच्या विस्तारासाठी काम केले. तसेच त्या नाशिकच्या महिला उद्योगिनी पतसंस्थेच्या अध्यक्ष असून सध्या मोगल या राजकारणापासून अलिप्त राहत सामजिक कार्य करत आहेत.
दागिन्यांच्या किंमतीची रोकड सैन्यदलाला पाठवली
दोन वर्षांपूर्वी निशिगंधा मोगल यांनी त्यांच्याजवळ असलेले सर्व स्त्रीधन भारतीय सैन्याला देण्याचे ठरवले होते. त्यानुसार त्यांनी पती आणि दोन मुलांशी चर्चा केली आणि 11 ऑक्टोबर रोजी स्त्रीधनाची असलेली 20 लाख रुपयांची रक्कम सैनिकांना मदत म्हणून दिली आहे. मी केलेल्या मदतीची प्रसिद्धी व्हावी हा उद्देश नव्हता, मात्र आभाराचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. इतरांनी देखील भारतीय सैन्याला मदत केली पाहिजे, अशी भावना मोगल यांनी व्यक्त केली आहे. भारतीय सैन्यदल दागिने स्वीकारत नसल्याने मोगल यांनी त्या दागिन्यांच्या किंमतीची रोकड स्वरूपात रक्कम सैन्यदलाकडे पाठवली आहे. मदत पोहोचल्यानंतर केंद्रीय रक्षा मंत्रालयाने मोगल यांना आभाराचे पत्र पाठवत धन्यवाद व्यक्त केले आहे. तसेच नाशिकमधील माजी सैनिकांच्या संघटनेने पुस्तक भेट देत सत्कार केला आहे.