महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 21, 2021, 9:54 PM IST

ETV Bharat / state

उद्या रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू - पालकमंत्री

सोमवारी (दि. 22 फेब्रुवारी) रात्री 11 वाजेपासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून नाशिक जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात येत आहे. तसेच सर्वांना मास्कचा वापर करणे बंधनकारक असून मास्कचा वापर न केल्यास एक हजार रुपयांचा दंड करण्यात येईल, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

मंत्री छगन भुजबळ
मंत्री छगन भुजबळ

नाशिक- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सोमवारी (दि. 22 फेब्रुवारी) रात्री 11 वाजेपासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात येत आहे. तसेच सर्वांना मास्कचा वापर करणे बंधनकारक असून मास्कचा वापर न केल्यास एक हजार रुपयांचा दंड करण्यात येईल, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

माहिती देताना पालकमंत्री

लग्न सभारंभामुळे रूग्ण संख्येत वाढ

कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी भुजबळ फार्म येथे आयोजित बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून लग्न समारंभाचे प्रमाणही वाढले असल्याने त्याचा विपरीत परिणाम म्हणून कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लग्न समारंभासाठी पोलीस यंत्रणेकडून एका वेळी फक्त 100 व्यक्तींनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात यावी. तसेच गोरज मुहूर्तावरील लग्न समारंभात होणाऱ्या गर्दीचे प्रमाण लक्षात घेवून, मंडप व लॉन्सच्या मालकांना येत्या गोरज मुहूर्तावरील लग्नांसाठी परवानगी देण्यात येवू नये. त्याऐवजी दुपारीच लग्न सोहळा संपन्न करावे. तसेच पोलीस यंत्रणेने दिलेल्या परवानगीनुसार लग्न समारंभ होत आहेत की नाही याबाबत महानगरपालिका व पोलीस यंत्रणामार्फत तपासणी करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

शासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना 28 फेब्रुवारीपर्यंत लसीकरण

जिल्ह्यातील कोरोना काळात फ्रंटलाईनवर राहून काम करणारे आरोग्य, पोलीस आणि महसूल विभागातील 69 हजारांपैकी 40 हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांना आतापर्यंत लसीकरण करण्यात आले आहे. उर्वरित अधिकारी कर्मचारी यांनी 28 फेब्रुवारीपर्यंत पुढाकार घेवून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन देखील पालकमंत्री भुजबळ यांनी केले आहे. तसेच जिल्ह्यात अजून साधारण 80 हजार लसचा साठा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतराचा नियमितपणे वापर करून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. येत्या आठ दिवसांत परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर यापेक्षा कठोर निर्बंध लादण्याबाबत निर्णय घेण्यात येतील, असे भुजबळ यांनी सांगितले आहे.

जिल्ह्यातील मृत्यूदर स्थिर, पण वाढती रुग्णसंख्या धोकादायक - जिल्हाधिकारी सूरज मांढरे

गेल्या चार ते पाच दिवसांत जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. यामध्ये 16 ते 20 फेब्रुवारी या पाच दिवसात शहरात 410, ग्रामीण भागात 77 आणि मालेगाव येथे 41, असे एकूण 534 रुग्णांची वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्याचा मृत्यूदर स्थिर असला तरी पंधरा दिवसात 1 हजार 731 रुग्ण वाढणे हे सर्वांसाठी धोकादायक आहे. तसेच एकूण रुग्णांच्या 80 ते 90 टक्के रुग्ण गृह विलगीकरणात असून त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

निफाड व दिंडोरी या तालुक्यात दुपटीने रुग्णसंख्या वाढ

ग्रामीण भागाचा विचार करता निफाड व दिंडोरी या तालुक्यात दुपटीने रुग्णसंख्या वाढत आहे. यासाठी सामाजिक कार्यक्रमांवर निर्बंध आणून गर्दीचे वाढते प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे.

हेही वाचा -शेतीपूरक उद्योगांना चालना देण्यासाठी शासन स्तरावर पाठबळ - दादा भुसे

ABOUT THE AUTHOR

...view details