नाशिक - 1972 साली मोहम्मद अली रस्त्यावर माझ्या सभेत हाजी मस्तान होता असे वादळ उठवण्यात आले होते, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. सार्वजनिक जीवनात काम करताना कोण-कोण भेटते हे बऱ्याच वेळा कळत नाही. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीत कुख्यात गुंड दाऊद त्यावेळी अनेक मंत्र्यांना भेटला होता, असे म्हटले होते. यावर येथील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर शरद पवार बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार पत्रकार परिषदेत बोलताना. पवार पुढे म्हणाले, संजय राऊत यांच्या स्टेटमेंटपासून मी दूर आहे. मला त्या वादात पडायचे नाही. मात्र, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल त्यांनी बोलायला नको होते. हे आमचे मत आहे. राऊत यांनी त्यांचे हे वक्तव्य मागे घेतल्यामुळे या वादावर आता पडदा पडला आहे, असेही पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक असणाऱ्यांबाबत स्थनिक पातळीवर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. या मंत्रिमंडळात सगळे शहाणी आहेत. सरकार पाच वर्षे चालवायचे आहे. यामुळे सरकारमधील सदस्यांना अस्वस्थता निर्माण करणारे वक्तव्य करू नये, अशी सूचना करणार नाही.
हेही वाचा -मुघलांचे वंशजही शिवरायांच्या वंशजांविरोधात 'असे' बोलले नसते - फडणवीस
तीन पक्षाचे सरकार करताना आम्ही काही निर्णय घेतले. यात युवकांना रोजगार, औद्योगिक धोरण, शेती पुनर्बांधणी धोरण ठरवले. या सरकारने सत्तेचा योग्य वापर करावा ही अपेक्षा आहे. आता पर्यंत 2 लाखांपर्यंतचे कर्ज असणाऱ्या 85 टक्के शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. येत्या अंदाजपत्रकात उरलेल्या 15 टक्के शेतकऱ्यांचा विचार केला जाणार असल्याचेही पवार म्हणाले.
तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि कारखान्यांसाठी चर्चा सुरू आहे. त्यांना देखील दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहे. केंद्रांने अवकाळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, असेही ते म्हणाले. तर बेळगावात मलाही पोलिसांनी मारहाण केली होती. मात्र, आम्ही बेळगावातील मराठी लोकांच्या पाठीशी आहे, असे पवार म्हणाले आहेत. आम्ही चीन सरकार प्रतिनिधी आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची एकत्रित बैठक करून दिली. द्राक्ष चीनला पाठवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कांदासाठा धोरण आणि निर्यात बंदी रद्द करावी, याकरिता दिल्लीत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना भेटणार असल्याचेही पवार म्हणाले. तर मनसे आणि भाजप यांना एकत्र यावे असं वाटत असेल तर त्यांनी यावे. निर्भया प्रकरणासंबंधी बोलताना ते म्हणाले, कायद्यात तरतूद असेल त्याप्रकारे फाशी द्यावी.
हेही वाचा -'साचेबद्ध शिक्षणाला कौशल्य विकासाची जोड देण्याची आवश्यकता'