नाशिक - अफजलखानचा कोथळा काढायला निघालेली शिवसेना ढोकळा खाऊन परतली असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शिवसेनेला लगावला. भाजपच्या नावाने विरोध करणारी शिवसेना सत्तेसाठी लाचार होऊन पुन्हा भाजपसोबत गेली. हे युती सरकार देशातील संविधानाचे महत्त्व कमी करून मनुवादाचा पुरस्कार करत आहे. त्यामुळे या निर्दयी सरकारला हटवण्याची संधी आहे ती वाया घालवू नका, असे आवाहन मलिक यांनी केले. संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी नाशिकच्या नानावलीत येथे सभा पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी नवाब मलिक म्हणाले, की देशातील हुकूमशाही आणि जुलमी सरकारला उलथवून लावण्याची ताकद केवळ सर्वसामान्य जनतेच्या मतांमध्ये आहे. त्यामुळे लोकशाही आणि संविधान वाचण्यासाठी या जुलमी सरकारला हटवा. की काळा पैशाच्या विरोधात आवाज भाजपने उठवला आणि आघाडी सरकारला बदनाम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी अनेक आश्वासने देऊन अच्छे दिनाचे खोटे स्वप्न जनतेला दाखविण्यात आले. मात्र, पाच वर्षात ते सर्व फोल ठरले. देशातील तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले. मात्र, रोजगार मिळण्यापेक्षा गेल्या ४५ वर्षांत वाढली नसेल एवढी बेरोजगारी मोदी सरकारच्या काळात झाली. कम्युनिकेशन क्षेत्रातील भारतातील बीएसएनएल कंपनीला मोडीत काढली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.