नाशिक -उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत व साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सवास आज पासून सुरुवात झाली आहे. नवरात्र काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सप्तशृंगीगडावर करण्यात आले आहेत.
सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. राज्यातल्या देवीच्या साडेतीन शक्तीपिठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर प्रतिवर्षाप्रमाणे श्री सप्तशृंगी देवीचा शारदीय नवरात्रोत्सव आजपासुन ते विजयादशमी या दरम्यान चालणार आहे. तर कावड यात्रा अर्थात कोजागिरी पौर्णिमा उत्सव 12 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर पर्यंत संपन्न होणार आहे. या कालावधीमध्ये श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीमध्ये विविध सेवाभावी संस्था गडावर व गडाकडे येणाऱ्या मार्गांवर ठिकठिकाणी भाविकांना सेवा देण्यासाठी सज्ज होत आहे.
हेही वाचा - कोल्हापुरात आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ
नवरात्रोत्सव काळात दररोज सकाळी 7 वाजता श्री भगवतीची पंचामृत महापूजा संपन्न होईल. नवरात्रोत्सवाचा मुख्य दिवस असलेल्या सोमवार, 7 ऑक्टोबर आश्विन शुद्ध महानवमीच्या दिवशी सकाळी 7 वाजता पंचामृत महापूजा, दुपारी 4 वाजता न्यासाच्या कार्यालयात ध्वजाचे पुजन, ध्वजाचे पुजन झाल्यानंतर ध्वजाचे मानकरी दरेगावचे गवळी पाटील कुटुंबीयाकडे ध्वज सुपूर्द केला जाईल व त्यानंतर ध्वजाची सवाद्य मिरवणूक संपन्न होईल. सायंकाळी पाच वाजता श्री. भगवती मंदिरातील सभामंडपात शतचंडी यज्ञ, होम हवन पूजा संपन्न होणार आहे. याच दिवशी रात्री 12 वाजता श्री भगवती शिखरावर कीर्तीध्वजाचे मानकरी दरेगावचे गवळी पाटील ध्वजारोहन करतील. मंगळवार, 8 ऑक्टोबर अर्थात विजयादशमी रोजी सकाळी दहा वाजता शतचंडी याग व पूर्णाहूती संपन्न होईल. त्यानंतर गडावर दसरा साजरा करण्यात येईल.
हेही वाचा - तुळजाभवानी मंदिरात घट स्थापना करून नवरात्र उत्सवास सुरुवात
गडावर शनिवार, 12 रोजी कोजागिरी पौर्णिमा उत्सावास प्रारंभ होईल. या दिवशी सकाळी 7 वाजता पंचामृत महापूजा संपन्न होईल. 13 ऑक्टोबरला सकाळी 7 वाजता पंचामृत महापूजा व दुपारी साडेबारा ते रात्री 8 वाजपर्यंत महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यातून कावडीधारकांनी आणलेले जल श्री भगवती मंदीरात स्विकारले जाईल. त्यानंतर श्री भगवतीचा रात्री 9 ते 12 वाजेपर्यंत वाजेपासून जलाभिषेक पंचामृत महापूजा संपन्न होणार आहे. सोमवार, 14 ऑक्टोबर रोजी सकाळी साडे सात वाजता शांतीपाठ संपन्न होईल. सप्तशृंगी गडावर नवरात्रौत्सवादरम्यान राज्यासह परराज्यातील लाखो भाविकांची मांदियाळी राहणार आहे.
हेही वाचा - 'यंदा नवरात्रोत्सवात टॅटूंची चलती, 'कलम ३७०' सह 'चांद्रयान-२' च्या टॅटूंनी वेधलं लक्ष'