नाशिक- दिवसेंदिवस पेट्रोलियम कंपन्यांकडून गॅस सिलिंडरच्या किमतीत भरमसाठ वाढ होत आहे. याचा निषेध करत राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेणाच्या गोवऱ्या व गॅस सिलिंडरची बिलं पोस्टाने पाठवून थाळीनाद करत संताप व्यक्त करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस वतीने वाढती महागाई, सिलिंडरचे वाढते दर याविरोधात घोषणाबाजी करून पंतप्रधान यांना शेणाच्या गोवऱ्या भेट म्हणून पाठवण्यात आल्या आहेत. गांधीनगर पोस्ट ऑफिसच्या बाहेर केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला आहे.
1 जानेवारी, 2021 पासून गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 190 रुपयांनी वाढ
कोरोना काळात अनेक लोकांना बेरोजगारीला सामोरे जावे लागले. त्यात महागाईने उच्चांक गाठला असून सर्वसामान्य लोकांना जीवन जगणे मुश्किल झाले आहे. केंद्र सरकार ढिम्म असून केवळ मजा पाहण्यात गर्क असल्याचे जाणवत आहे. 1 जानेवारी, 2021 पासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 190 रुपयांनी वाढ झाली आहे. 1 मार्च, 2014 रोजी सिलिंडरचे दर 410 रुपये होते. आजमितीला हेच दर 900 रुपयांच्यावर गेले आहे. त्यामुळे सर्वसामान्य गृहिणी यांचे बजेट कोलमडले आहे.
हेही वाचा -नाशिकचे पुरोहित सांगत आहेत कालसर्प आणि पितृपक्ष पूजेचे महत्व